गद्दारी गाडण्यासाठी ‘मशाल’ पेटवा

‘शिरूरचा किल्ला सुरक्षित आहे, त्यामुळे मी मावळमध्ये आलो आहे. पिंपरी-चिंचवडच्या शहराच्या विकासाच्या बाबतीत आचारी कोण होता आणि वाढपी कोण होता, हे नागरिकांना माहीत आहे. महागाई, बेरोजगारी नष्ट करण्यासाठी बळकट हाताने ‘मशाल’ पेटवायची आणि विजयाची ‘तुतारी’ फुंकायची आहे. गद्दारी गाडण्यासाठी ‘मशाल’ प्रज्वलित करावी,’ असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, ‘शिवसैनिक हा निखाऱयासारखा असतो. तो विनाकारण पेटत नाही. तो एकदा का पेटला, तर कोणाच्या बापाला ऐकत नाही, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितला, तर 12 मावळ्यांचा मोठा हात होता. त्यामुळे संजोग वाघेरे-पाटील हे नशीबवान असून, मावळसारख्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावून अद्दल घडविण्याचा रावणाचा प्रयत्न होता. मात्र, हनुमंतरायाने शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेपटीची मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली. त्यामुळे आता ही ‘मशाल’ लक्षात ठेवा.’