ग्रंथयात्रा- कीचकवध

>> अर्चना मिरजकर

22 फेब्रुवारी 1907. रात्री दहा वाजण्याचा सुमार. सांगलीतील रंगमंदिर प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. रंगमंचावर युधिष्ठिर आणि भीम यांच्यात संवाद चालला होता. द्रौपदीवर वाईट नजर ठेवणाऱया आणि बळजबरीने तिला आपली बटीक बनवू पाहणाऱया उद्दाम कीचकाला मारून टाकण्याशिवाय गत्यंतर नाही असे भीम युधिष्ठिराला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु सहिष्णुतेने कीचकाचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा असे युधिष्ठिराचे मत होते. हा प्रसंग समरसपणे पाहणाऱया प्रेक्षकांचा भीमाला पूर्ण पाठिंबा होता. याउलट युधिष्ठिराची पूर्णत अप्रासंगिक प्रतिािढया पाहून प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी जराही सहानुभूती नव्हती.

हे नाटक होते कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले ‘कीचकवध’. खाडिलकरांनी जुन्या पौराणिक आख्यानांना समकालीन राजनैतिक संदर्भ जोडले आणि त्यावर उभारलेले नाटक समाजाला जागृत करण्याचे एक साधन म्हणून वापरले. नाटय़लेखनाबरोबरच खाडिलकरांनी ‘केसरी’, ‘मराठा’, ‘लोकमान्य’ आणि ‘नवाकाळ’ या वृत्तपत्रांचे संपादनही केले. ‘केसरी’त असताना ते लोकमान्य टिळकांचे आघाडीचे सहकारी होते. टिळकांच्या इंग्रजांविरूद्धच्या ज्वलंत विचारसरणीचेच प्रतिबिंब आपल्याला ‘कीचकवध’ या नाटकात दिसून येते. वरवर पाहता हे नाटक महाभारतातील कीचकवधाच्या आख्यानावर आधारित दिसते. पांडव अज्ञातवासाच्या काळात मत्स्य देशाचा राजा विराट याच्या राजवाडय़ात राहत असताना विराटचा सेनापती कीचक द्रौपदीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे शासन म्हणून भीम त्याचा वध करतो अशी कथा महाभारतात येते. खाडिलकरांनी या नाटकाद्वारे त्या काळी ब्रिटिशांविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य लढय़ाचे चित्र रंगवले. हे संपूर्ण नाटकच एक रूपक म्हणून त्यांनी योजले. कीचकाचा द्रौपदीचे शीलहरण करण्याचा प्रयत्न हे ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातील अत्याचारी धोरणांचे प्रतीक झाले. कीचक म्हणजे तेव्हाचा व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन, द्रौपदी म्हणजे भारतमाता; भीम म्हणजे जहाल राष्ट्रवादी आणि युधिष्ठिर हा मवाळ राष्ट्रवाद्यांचे प्रतीक झाला. कीचकाच्या तोंडचे संवाददेखील लॉर्ड कर्झनच्या कुप्रसिद्ध वचनांवर आधारित होते. त्या काळी जनमानसात खदखदत असलेला ब्रिटिशांच्या वरचा राग आणि असंतोष आपल्याला द्रौपदी आणि भीम यांच्या संवादांमध्ये दिसतो.

उन्मत्त आणि सत्तेच्या अंमलाखाली इतरांना तुच्छ लेखणारा, इतरांच्या हक्काची पर्वा न करणारा कीचक आणि नीतिमत्ता व कर्तव्यपालन करणारे, द्रौपदीचे रक्षण करण्यासाठी धडपडणारे पांडव यांच्या विरोधाभासात्मक चित्रणातून खाडिलकर भारतीयांचे शोषण करणारे इंग्रजी सत्तेचे स्वरूप प्रभावीपणे उलगडून दाखवतात. प्रेक्षकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध प्रक्षोभ निर्माण करण्यासाठी एका पौराणिक खलनायकाचा ते कौशल्याने उपयोग करून घेतात.

अशाच एका प्रयोगाला प्रेक्षकांमध्ये हजर होता ब्रिटिश पत्रकार इग्नेशियस व्हॅलेंटाईन चिरोल. प्रेक्षकांमधील पुरुषांना आलेली कीचकाची चीड आणि बायकांची द्रौपदीला असलेली सहानुभूती त्याला स्पष्ट दिसत होती. युधिष्ठिराच्या मवाळ धोरणाविषयीची नापसंती आणि भीमाच्या आवेशपूर्ण प्रतिकाराचे व कीचकाच्या वधाचे प्रेक्षकांनी केलेले समर्थन त्याला अस्वस्थ करीत होते.

1910 साली चिरोलने ‘भारतीय असंतोष’ (घ्ह्ग्aहळहू) नावाचे पुस्तक लिहिले. त्यात त्याने ‘कीचकवध’ नाटकाचे कथानक आणि त्याचे रूपकात्मक स्वरूप उकलून दाखवले. त्याच्या मते, जॉन मोर्ले या ब्रिटिश संपादकाने जहाल राष्ट्रवाद्यांच्या आत्मविश्वासाचा जो उपहास केला होता, त्याला हे नाटक एक समर्पक उत्तर होते. याच सुमारास हिंदुस्थानात उसळलेल्या ाढांतिवीरांच्या संघर्षाला थोपवण्यासाठी ब्रिटिश सरकार वृत्तपत्रविरोधी कायदा लागू करण्याच्या विचारात होते. त्याच्या समर्थनार्थ सरकारने किंग्केड् या ब्रिटिश न्यायाधीशाला हिंदुस्थानी वृत्तपत्रांच्या चळवळीवर लेख लिहिण्याची विनंती केली. किंग्केड्ने ‘टाइम्स’मध्ये चार लेख लिहिले. त्यापैकी एका लेखात त्याने ‘कीचकवध’ हे नाटक कसे लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे प्रोत्साहन देत आहे याचे वर्णन केले.

या सर्वांचा परिणाम होऊन जानेवारी 1910 मध्ये ‘कीचकवध’ नाटकावर बंदी घातली गेली. नाटकाच्या पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्यात आल्या. त्यानंतर सोळा वर्षांनी ही बंदी उठवण्यात आली. तोपर्यंत हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेच्या विरोधाचे स्वरूप पूर्ण पालटून गेले होते. 1926 पासून या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू झाले, परंतु आता पूर्वीप्रमाणे भीमाच्या तोंडच्या संवादांना टाळ्या न पडता युधिष्ठिराच्या संवादांना टाळ्या पडू लागल्या.

टिळकांच्या निधनानंतर खाडिलकरांनी महात्मा गांधींची मवाळ राजनीती आत्मसात केली. या बदललेल्या परिस्थितीत ‘कीचकवध’ नाटकाचा पूर्वीसारखा प्रभाव पडेनासा झाला, परंतु सुरुवातीच्या काळात या नाटकाने जी खळबळ माजवली, त्यामुळे मराठी साहित्याच्या प्रवासात हे नाटक महत्त्वाचे ठरले. समकालीन सामाजिक आणि राजनैतिक परिस्थितीचे पडसाद साहित्यात कसे पडतात, साहित्य या परिस्थितीला कसे वळण देते याचे हे उत्तम उदाहरण आहे.