Art International Festival – स्पेनमध्ये वसईच्या रांगोळी कलाकाराची अदाकारी

गेल्या काही वर्षात वसईचे नाव रांगोळी कलाकारांमुळे देशपातळीवर गाजत आहे.जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांचे माहेरघर असं ओळखलं जातं.येथील कलाकारांनी आपल्या रांगोळीची कला देशाबाहेरही दाखवली आहे.वसई कला क्रिडा महोत्सव असो किंवा जुचंद्र येथील आई चंडीका देवीचा यात्रौत्सव असो या कलाकारांच्या जिवंत रांगोळ्या कुतूहलाचा विषय ठरत असतात. पारंपरिक रंगावली ते थ्रीडी रंगावली हा प्रकार याच वसईतील कलाकारांनी विकसित केला आहे.

जूचंद्र गावचे कलाकार, भौमितिक रांगोळीचे जनक संजय नंदा पाटील यांना स्पेन येथे आयोजित केलेल्या इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.या आर्ट फेस्टिवल मध्ये तब्बल 13 हून अधिक देशातील कलाकारांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आपली कला सादर केली होती. नुकत्याच देशाने आपली चांद्रयान तीन मोहीम यशस्वी पूर्ण केली आहे. त्यामुळे जगभरात भारताचे कौतुक होत आहे.त्यावेळी संजय पाटील यांनी इस्रोच्या लोगोसह भारत व चांद्रयान यानाची साकारलेली 10 फूट बाय 10 फूट ची भौमितिक रांगोळी विशेष लक्षवेधक ठरली आहे.या कौतुकास्पद कामगिरी करीता त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.