सिनेमा – रेखा… अधुरी एक कहानी

>> प्रा. अनिल कवठेकर

काहींचं आयुष्यच अगदी फिल्मी असतं. चित्रपटात घडणाऱ्या घटना कधीकधी अतिरंजित असतात, पण काही काहींचं जीवनच अतिरंजित असतं. ते काल्पनिक वाटतं. मनाला पटत नाही. तसंच काहीसं रेखाच्या बाबतीत आहे. रेखा म्हणजे मनातल्या खोल दरीत आपलं प्रेम लपवून ठेवून आनंदाने जगणारी, प्रेम विफल झाल्यानंतरही हिमतीने ते प्रेम जगापुढे मांडण्याचा बिनधास्तपणा असणारी, रेखा म्हणजे खऱया अर्थाने जगणं समजलेली एक आधुनिक स्त्राr आहे.

रेखा म्हणजे आपलं प्रेम मनातल्या खोल दरीत लपवून आनंदाने जगणारी एक बिनधास्त आधुनिक स्त्री ! ‘इंडियन आयडॉल’च्या एका एपिसोडमध्ये तिथल्या अँकरने रेखाला थेट प्रश्न न विचारता एक प्रश्न विचारून प्रेक्षकांना आवाहन केलं होतं. तो म्हणाला, “तुम्ही अशी एखादी स्त्री पाहिली आहे का, जी एका विवाहित पुरुषाच्या प्रेमामध्ये वेडी झालेली आहे, झपाटून गेलेली आहे आणि त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे?” त्याने असं म्हणताच तो प्रश्न रेखाने स्वत:कडे घेत दिलखुलासपणे म्हणाली, “खरं तर हा प्रश्न मला विचारायला हवा होता?” नंतर “मी असं कुठे काही म्हणाले नाही.” असं म्हणून आयुष्यभर आपल्या हृदयाच्या कप्प्यात सांभाळून ठेवलेल्या त्या मखमली प्रेमाच्या जखमेला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवत तिने त्या मैफलीत आनंदाचे आणि सौंदर्याचे प्रसन्न रंग भरले.

प्रेम होत नाही, केलंही जात नाही. ते आपोआप घडतं. प्रेम आपोआप होत असतं आणि तसंच रेखाच्या बाबतीत झालं. आपलं प्रेम विफल झाल्यानंतरही समर्थपणे उभं राहून, हिमतीने ते प्रेम जगापुढे मांडण्याचा बिनधास्तपणा असणारी रेखा म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं समजलेली एक आधुनिक स्त्री आहे असं मला वाटतं. ‘इंडियन आयडॉल’च्या स्टेजवर या वयातही तिने गाणं गायलं. खरं तर तिचं वय काय याचं गणित आपण करायचं नाही. ती किती वयाची आहे? असं आपल्याला वाटतं तेच तिचं वय आहे. ती जेव्हा जेव्हा कोणत्याही कार्पामात प्रेक्षकांसमोर येते, तेव्हा तेव्हा अमिताभशिवाय जीवनात असणारी अपूर्णता कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्यासमोर मांडते. या कार्यक्रमात तिने तेच केलं. तिने जे गाणं गायलं ते असं होतं,

‘जुस्तजू जिसकी थी, उसको तो न पाया हमने
तुझको रुसवा न किया, खुद भी पशेमान हुये
इश्क की रस्म को, इस तरहा निभाया हमने…’

ज्या प्रेमाला मी शोधत होते, हृदयाचे डोळे करूनही ते प्रेम मला कधीच लाभलं नाही. पण मला प्रेम लाभलं नाही म्हणून मी त्याला बदनाम केलं नाही. मात्र स्वत: पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये जळत राहिले. तेव्हा घेतलेल्या त्या प्रेमाच्या आणाभाका मी अजूनही निभावत आहे. रेखा कदाचित हे स्वत:लाच सांगत असावी. पण ते सांगणं सातत्याने चालू आहे. कोणत्याही कार्पामात रेखा एखाद्या नवविवाहितेसारखी नटून थटून आलेली आपल्याला दिसते. जणू तिच्या मनातल्या त्या अतृप्त प्रेमाच्या पूर्णतेची वाट तिचं अंतर्मन अजूनही पाहत आहे आणि ते तिच्या वागण्यातून व्यक्त होत आहे.

खरं तर रेखा आणि जया बच्चन या एकाच इमारतीमध्ये राहत होत्या. दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखा जयाला आपली मोठी बहीण अर्थात ‘दीदी जया’ असं म्हणत असे. तेव्हा जया बच्चनचा ‘गुड्डी’ पिक्चर रिलीज झालेला होता आणि तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालेलं होतं. त्याच वेळेला अमिताभ आणि जया यांचं प्रेमप्रकरणही चालू होतं. अमिताभ आणि जया कारमधून जेव्हा फिरायला जात तेव्हा मागच्या बाजूला रेखा बसलेली असायची. असा त्यांचा एक सुंदर मैत्रीपूर्ण प्रवास होता. पण गडबड अशी झाली की, जेव्हा अमिताभचं आणि जयाचं लग्न झालं, त्या लग्नाला जयाने एकाच इमारतीत राहणारी आपली मैत्रीण रेखाला बोलावलं नाही आणि हे रेखाच्या मनात कुठेतरी सलत राहिलं. अर्थात तिथून त्यांच्या मैत्रीमध्ये थोडासा दुरावा आला. तोपर्यंत रेखा अमिताभच्या व्यक्तिमत्त्वावर भाळलेली नव्हती. रेखाच्या जीवनात अमिताभचं तोपर्यंत कोणतंही स्थान नव्हतं. पण जेव्हा ‘दो अंजाने’च्या निमित्ताने रेखा आणि अमिताभ बच्चन दोघे पहिल्यांदा एकत्र आले, तिथून एक वेगळी रेखा आकार घेऊ लागली.

या चित्रपटापूर्वी रेखाबद्दल इंडस्ट्रीमध्ये फारसं चांगलं बोललं जात नव्हतं. ती कधीही वेळेवर येत नसे. कोणतेही काम सीरियसली करत नसे. टाईमपास करणं, फिरायला जाणं असं तिचं चाललेलं असे. मग चित्रपट पूर्ण कसा होणार? अशी भीती निर्मात्यांना वाटू लागली. पण घडलं वेगळंच. अमिताभचे अभिनय कौशल्य, अमिताभचा कामाबाबतचा सीरियसपणा, अमिताभचं सेटवर वेळेआधी येणं, मेकअप करून शॉटसाठी तयार होऊन बसणं, आपल्या दृश्याविषयी दिग्दर्शकाशी चर्चा करणं, शूटिंग संपल्यानंतर पॅकअप झाल्यानंतर ताबडतोब घरी जाणं… या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम संस्कार रेखाच्या मनाने स्वीकारला. तिच्या अंतर्मनातली वीणा झंकारली आणि तिला जाणवलं की, आयुष्यात ती ज्या माणसाचा शोध घेत होती तो हाच माणूस आहे. तिला माहीत असूनही नकळतपणे तिचं मन अमिताभकडे ओढलं गेलं आणि आपण अमिताभशिवाय राहू शकत नाही हे तिला जाणवलं. अमिताभला मात्र याबाबत काही माहिती नव्हती.

तिच्या आयुष्यात तिने कमालीचे बदल केले. मीना कुमारीचा मेकअपमन रामदादा याला तिने मेकअप करण्यासाठी नेमले. योगासनं सुरू केली. ती पूर्णपणे शाकाहारी झाली. तिने आपल्या भाषेवर काम केलं, आपल्या सौंदर्यावर काम केलं, आपल्या दिसण्यावर, मेकअपवर काम केलं. सेटवर कमालीच्या शिस्तीत ती वागू लागली. ‘दो अंजाने’ हा चित्रपट चालला नाही, पण या चित्रपटामुळे पहिल्यांदा रेखाच्या कामाची फिल्म इंडस्ट्रीमध्ये तारीफ झाली. आपल्या सगळ्या यशाचं क्रेडिट तिने अमिताभला दिलं. अमिताभ तिचा मित्र झाला, अमिताभ तिचा गुरू झाला आणि नकळतपणे तो तिचा प्रियकरही झाला.
रेखाचं आयुष्य बदललं आणि त्यासोबत रेखाचं भविष्यसुद्धा. अमिताभ नावाच्या अभिनयाच्या बादशहाच्या सहवासाच्या मुशीतून एक परिपक्व अभिनेत्री होण्याकडे रेखाचा प्रवास सुरू झाला. पुढे ‘खून पसीना’, ‘आलाप’, ‘इमान धरम’ यांसारख्या चित्रपटांत दोघेही सोबत आले. अमिताभबरोबर केलेल्या चित्रपटांमुळे रेखाचा भाव अमिताभसारखा वधारला आणि ती ‘लेडी अमिताभ’प्रमाणे वागू लागली. इतकंच काय, तिच्या नृत्यांमध्येसुद्धा अमिताभच्या नाचण्याच्या अनेक अदा आलेल्या दिसतात. अमिताभ बच्चनचा तसा फारसा न चाललेला चित्रपट म्हणजे ‘मिस्टर नटवरलाल!’ यातलं गाणं हे पुन्हा अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमकहाणीवर आधारित असावं असं वाटायला लावणारं आहे. ते गाणं असं होतं…

‘हे हे हे चोरी चोरी मिलते है रे चांद चकोरी
परदेसिया ये सच है पिया
सब कहते है मैने तुझको दिल दे दिया
मै कहती हुं तुने मेरा दिल ले लिया’

या काळात त्यांचं जगणं, त्यांचं वागणं अगदी या गाण्यात लिहिलेल्या शब्दाप्रमाणे लपून छपून चाललं होतं आणि लोकही त्यांच्याबद्दल असंच बोलत होते. गीतकाराने तेच चपखलपणे पकडलेलं आपल्याला जाणवतं. त्यावर अमिताभचं कडवं होतं,

‘लोगो को कहने दो कहते ही रहने दो
सच झूठ हम क्यू सबको बताये
मै भी हू मस्ती मे तू भी है मस्ती मे
आ इस खुशी मे हम नाचे गये
किस को पता क्या किसने किया
सब कहते है तुने मेरा दिल दे लिया
सब कहते है मैने तुझको दिल दे दिया…’

या गाण्यातील दोघांच्या नृत्याच्या अदा पाहिल्यानंतर रेखाच्या नृत्याच्या अदेमध्ये अमिताभची स्टाइल आलेली चांगली जाणवते. ही गाणी जितकी गाजली, तितकंच त्या काळातील त्यांचं प्रेम गाजलं आणि त्या प्रेमाचा आधार ठेवून ‘सिलसिला’ नावाचा चित्रपट आला. ‘सिलसिला’मधली भूमिका जया बच्चनने नाकारला होती. परंतु यश चोप्राने तिला नायक किताही भरकटला तरी शेवटी आपल्या पत्नीकडे परत येणार आहे, असं सांगितलं. तेव्हा तिने हा चित्रपट स्वीकारला. चित्रपटातील दोघींचे संवाद त्यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनातील संवाद वाटतील असे आहेत.

जया बच्चनच्या अटीप्रमाणे दोघेही यापुढे कधीही काम करणार नव्हते. त्यामुळे चित्रपटातील सगळ्या दृश्यात दोघांनी एकमेकांना मारलेल्या घट्ट मिठय़ा जाणवतात. या मिठीमध्ये आता मी तुला घेऊ शकणार नाही आणि तू मला घेऊ शकणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून निसर्गाने आपल्याला दिलेली ही शेवटची संधी आहे भेटण्याची, आपलं प्रेम व्यक्त करण्याची. कदाचित हा पहिला चित्रपट असेल ज्या चित्रपटात अमिताभ आणि रेखाला अभिनय करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना त्यांचं वास्तव जगणं पडद्यावर जगायचं होतं आणि ते मनसोक्त जगले.

कसं ते पाहण्यासाठी ‘सिलसिला’ पुन्हा पाहायला लागेल. म्हणजे माझं म्हणणं आपल्या लक्षात येईल. या चित्रपटाप्रमाणेच या दोघांच्या प्रेमकहाणीचा शेवट झाला. अमिताभ बच्चनसारख्या संस्कारी पुरुषाने आपल्या पत्नीला सोडले नाही. कारण त्यांनी जयाला तसा शब्द दिला होता की, मी कधीही तुला सोडणार नाही.

गंमत म्हणजे रेखाच्या वाढदिवसानिमित्त लेख लिहिताना अमिताभ बच्चन या उल्लेखाशिवाय हा लेख लिहिणं किती अशक्य होतं हे मला जाणवलं. रेखाचं हेच प्रेम जे तिला प्राप्त झालं नाही. त्यांची कहाणी अधुरी राहिली. पण त्यांच्या प्रेमामुळे दोघांची ओळख कित्येक दशके सगळ्यांना झालेली आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)