तृतीयपंथी महिलांची प्रकाशवाट : अॅना ब्रानाबिक

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी

सर्बिया देशाची पहिली महिला पंतप्रधान आणि अधिकृतपणे स्वीकारली गेलेली पहिली तृतीयपंथी महिला अॅना ब्रानाबिक. एका सामान्य व्यक्तीने पंतप्रधानपदाला ज्याप्रकारे न्याय द्यावा किंवा अपेक्षा असते त्याच पठडीतले काम स्वतकडून होईल यासाठी प्रयत्नवादी असणाऱया ब्रानाबिक यांचे विवेकवादी विचारधारेतून घडलेले असे हे व्यक्तिमत्त्व एका झुंजार महिलेची चरित्रगाथा आहे असेच म्हणायला हवे.

आजच्या भागात सर्बिया देशाची पहिली महिला पंतप्रधान आणि अधिकृतपणे स्वीकारली गेलेली पहिली तृतीयपंथी महिला अॅना ब्रानाबिकची ही गोष्ट! ही काल्पनिक गोष्ट नसून सत्य-प्रवर्तित एका झुंजार महिलेची चरित्रगाथा आहे. अॅना ब्रानाबिक ही देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारी जगातली दुसरी तृतीयपंथी व्यक्ती आहे.

सर्बिया देशाची पंतप्रधान ही तृतीयपंथी महिला असण्याबद्दल किंवा त्यामुळेच या पदाचे महत्त्व वाढल्याबद्दल ब्रानाबिक स्पष्ट नकार देते. आपण एक व्यक्ती आहोत, एक स्त्राr किंवा एक पुरुष याप्रमाणे तृतीयपंथी व्यक्ती… त्यामध्ये असाधारण असे काही नसल्याचे ब्रानाबिक यांचे म्हणणे आहे आणि म्हणूनच त्यांच्या नियुक्तीचे महत्त्व अधोरेखित होते. ब्रानाबिक, आपण कोण आहोत याचे भांडवल करत नाहीत, तर एका सामान्य व्यक्तीने पंतप्रधानपदाला ज्याप्रकारे न्याय द्यावा त्याच पठडीतले काम ब्रानाबिक स्वतकडून होईल यासाठी पूर्ण प्रयत्नवादी असते. ब्रानाबिक म्हणतात, ‘मी सर्बिया देशाची पंतप्रधान आहे आणि तीच माझी ओळख आहे. जगाने मला पंतप्रधान म्हणूनच ओळखावे.’ त्यामुळे कोणत्याही प्रकारची सहानुभूती विशेष अधिकार, सवलती याची मागणी त्या करतच नाहीत. परंतु तृतीयपंथी हक्कांसाठी लढणाऱया अनेक परिषदा आणि मोर्चांनासुद्धा एकप्रकारे स्वतच्या जीवनातून त्या संदेश देत आहेत.

अॅना ब्रानाबिक या अतिशय धाडसी स्त्राrचे व्यक्तिमत्त्व विवेकवादी विचारधारेतून घडले असावे. यापूर्वीही जोहाना सिगूर्टौटीर या पहिल्या तृतीयपंथी स्त्रीने आधीच पंतप्रधान म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

ब्रानाबिकचा जन्म 28 सप्टेंबर 1975 मध्ये बेल्ग्रेड येथे झाला. तेथेच त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण झाले. अमेरिकेतील मिशिगन येथील नॉर्थवुड विद्यापीठातून त्यांनी व्यवसाय प्रशासकीय कौशल्य या विषयात पदवी मिळवली. इंग्लंडमधील हल विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील अर्थ व्यवस्थापनाकडे आपला मोर्चा वळवला. सर्बियामधील नगर परिषदा व्यवसायानुकूल बनवण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी नगर परिषदांमध्ये स्थानिक स्वयंसहाय्यता गट निर्माण करून त्या-त्या भागांमधील व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांनी केले. त्यातून सुयोग्य गुंतवणूक, गुंतवणुकीला चालना आणि व्यवसायाची भरभराट या तीनही गोष्टी साध्य झाल्या.

जवळजवळ एक तप त्यांनी आंतरराष्ट्रीय संघटना, परदेशी गुंतवणूक आणि सर्बियामध्ये लोकसेवामध्ये काम केले. सर्बियामध्ये काम करणाऱया अमेरिकन व्यवसायाभिमुख कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही काम केले, तर सर्बियातील विविध प्रोजेक्टस्मध्ये त्यांनी सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही काम केले.म्हणूनच ब्रानाबिक यांची नियुक्ती नगर परिषदीय आर्थिक विकास कार्पामांमध्ये ज्येष्ठ समन्वयक म्हणून झाली.

2016 साली त्यांची नियुक्ती लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून झाली. त्याबरोबरच, सर्बियन सरकारमध्ये नावीन्यपूर्ण उद्योजकीय आणि माहिती तंत्रज्ञान परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती झाली, राष्ट्रीय अल्पसंख्यक परिषदेच्याही त्या अध्यक्षा झाल्या. 2017 मध्ये अलेक्झांडर व्हुयूचीट यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष म्हणून झाली आणि त्यांचे पंतप्रधानपद रिक्त झाले. या पदावर आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांनी अॅना ब्रानाबिकची नियुक्ती केली. सर्बियातील केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी ब्रानाबिक प्रयत्नशील होत्या. 2018 मध्ये त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले. एकूणच सर्बियातील सुधारणावादी कामांमुळे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती योग्यच होती. मात्र राष्ट्राध्यक्षांचे पपेट म्हणून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. खरे तर सर्बियाच्या संसदेमध्ये त्यांची 250 पैकी 157 अशा मताधिक्याने निवड झाली होती, परंतु ब्रानाबिक यांच्यावर ठपका तसाच राहिला. त्यांच्यावर पाश्चिमात्य देशविरोधी आणि रशियन अनुकूल मंत्री असेही लेबल लावण्यात आले. पण या सर्व प्रवादांकडे दुर्लक्ष करून अॅना यांनी त्यांचे काम नेटाने सुरू ठेवले. त्या युरोपीय संघटन समर्थक आणि तंत्रज्ञ पंतप्रधान म्हणून ख्याती प्राप्त झाल्या.

त्या म्हणतात, ‘एकंदर देशातील समाजाचे आधुनिकीकरण, शिक्षण सुधार आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर माझा जास्त भर असणार आहे. लोक जे म्हणतात ते म्हणायला ते स्वतंत्र आहेत.’ युरेशियन आर्थिक संघटन आणि सर्बिया यामधील मुक्त व्यापाराच्या करारावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सर्बिया व्यापाराचा प्रसार होण्यास मदत होणार होती. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी सर्बिया प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये रीतसर प्रवेश केला.

कोरोनाच्या आपत्कालीन काळात ब्रानाबिकांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. त्यांना आरोग्य संकट समितीच्या अध्यक्षा नेमण्यात आले. अतिशय कुशलतेने ब्रानाबिकांनी आपली भूमिका बजावलेली दिसून आली.

आजपर्यंत सुधारणावादी, स्वयंपूर्णता मोहिमेसाठी त्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातच ऑर्डर ऑफ रिपब्लिका सर्पाऐका (सर्बियन) पुरस्कार आहे. 2019 मध्ये जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान स्त्राr म्हणून ‘फोर्ब्स’ यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले. तृतीयपंथींच्या अधिकारासाठी त्या पूर्वीइतक्याच जागरूक आहेत. म्हणूनच श्रेय घेण्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात अॅना ब्रानाबिक ही एक गाथा बनते.

एकंदर जग हे दोन स्पष्ट धारांमध्ये विभागलेले आहे. जगातील काही देश हे तृतीयपंथ मान्य करून त्यांचे सर्व अधिकार मान्य करतात आणि त्यांना ते मिळावे यासाठी पाठिंबा देतात. दुसरा देशांचा गट, तृतीयपंथी लोक आहेत हे मान्य करतात, परंतु त्यांच्या विशेष अधिकाराची गोष्ट मात्र त्यांना अमान्य असते. त्याचे जगणे नैसर्गिकतेला धरून आहे हेही अनेकदा काही देशांना मान्य नाही. सबंध जगच असे ज्या प्रश्नावर दोन भागात विभागले गेले असताना, अशा व्यक्तीने देशाचे महत्त्वाचे पद भूषवावे ही सामान्य गोष्ट नव्हेच.

[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)