शक्तिरंग – लोकल टू ग्लोबल

>> गणेश आचवल

आपण काही फूड ऍपवरून खाद्यपदार्थ मागवतो. साधारणपणे फूड डिलिव्हरी करणारी व्यक्ती ही पुरुष असते, पण वसई-विरारमध्ये हे चित्र थोडेसे वेगळे दिसेल. कदाचित तुम्हाला फूड डिलिव्हरी करताना काही महिला दिसतील. याचे श्रेय जाते ते किरण बडे यांना. किरण बडे यांच्याशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘‘मी 1996 साली वसईला आले. मी फॅशन डिझायनिंग केले होते, मला अवगत असलेल्या या कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी मी टेलरिंग कोर्स, ब्युटिशिअन कोर्स याचे क्लासेस सुरू केले. त्यावेळी अर्थार्जन करणे गरजेचे होते.’

ज्या महिलांमध्ये कला आहे त्यांना रोजगार निर्माण करता यासाठी किरण बडे वरळी जनशिक्षण संस्था, आयडीएफ म्हणेज इंडियन डेव्हलपमेंट फाऊंडेशन, सूचना एनजीओ अशा संस्थांना भेटल्या. या कंपन्यांकडील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठीचा निधी किरण यांच्या संस्थेतील शिक्षकांच्या पेमेंटसाठी केला जावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आजपर्यंत किरण बडे यांनी सोळा हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगार प्रशिक्षण दिले आहे. 2007 साली त्यांनी ‘समृद्धी महिला बचत गट सुरू करून त्याची अधिकृत नोंदणीदेखील केली. त्याच्या माध्यमातून त्या परदेशापर्यंत पोचल्या. त्या बचत गटाचा अभ्यास करण्यासाठी परदेशस्थ लोक अभ्यासाला आले. त्यांच्या बचत गटातर्फे महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच ठाणे बँकेत त्यांनी एकशे पंचाहत्तर बचत गट केले. किरणजी यांचा बचत गट हा पहिला गट आहे की ज्यांनी एनएसडीएलबरोबर संपर्क साधून त्यांनी बचत गटाचे पॅनकार्ड तयार करून घेतले. आजपर्यंत केलेल्या प्रवासाबद्दल किरणजी म्हणतात, ‘आमच्या गटातील प्रत्येक महिलेकडे शासनाचे सर्टिफिकेट आहे. महाराष्ट्र व्यावसायिक प्रशिक्षण मंडळाची आणि स्किल इंडियाची फ्रँचाइजी माझ्याकडे आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण देतो. लॉकडाऊनमध्ये महिलांना सुपर वुमन रायडर बनवण्याचे सुचले. मग आम्ही झोमॅटो आणि स्विगी यांच्याबरोबर समन्वय साधला. चाळीस रिक्षांचे वितरण आम्ही केले आहे. झोमॅटोमध्ये आम्ही पन्नास महिलांना संधी दिली. तीस महिलांना इलेक्ट्रिक सायकल, दहा महिलांना गाडय़ा वितरित केल्या. वर्ल्ड ट्रेंड सेंटर, पालघरचे डीआयसी ऑफिस आणि एनसीडी अशा अनेक संस्थांसोबत आम्ही कार्य करत आहोत.

‘महिलांची आवड लक्षात घेऊन टेलरिंग, ज्वेलरी मेकिंग, ब्युटिशिअन, वेल्डिंग, प्लम्बिंग अशा विविध कौशल्यांचे किरणजी आणि त्यांची टीम महिलांना प्रशिक्षण देतात. टू व्हिलर आणि फोर व्हिलरचे प्रशिक्षण, घर रंगवण्याचे प्रशिक्षणसुद्धा त्या देतात. आगामी योजना कोणत्या आहेत, यावर त्या म्हणतात, ‘मला कमीत कमी शंभर इलेक्ट्रिक टू व्हिलर्स आणायच्या आहेत. माझी पाच ते सहा उद्योग केंद्रे येत्या काही महिन्यांत सुरू होत आहेत. आयडीएफची मी संचालिका आहे. उद्योजक मेळावा आयोजन, डिजिटल मार्केटिंग, पॅकेजिंग, फायलिंग, लायसेन्स नोंदणी अशा गोष्टींचे प्रशिक्षण पण आम्ही देतो. डीआयसीतर्फे माझ्या हस्ते पन्नास उद्योजिका घडवणे हे माझे उद्दिष्ट आहे. महिलांनी जर गाडी घेऊन महिलांना लेडीज स्पेशल ट्रेनच्या वेळेनुसार स्टेशनपर्यंत पिकअप ड्रॉपची सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा विचार आहे. मेडिकल असोसिएशनशी संपर्क साधून ज्येष्ठांसाठी औषधे पोचवणे, किराणा माल पोचवणे ही कामेसुद्धा केली जाणार आहेत. आम्ही काही रिक्षा ऍम्ब्युलन्ससुद्धा सुरू करत आहोत. मागे मी मॉरिशस ट्रेंड फेअरला जाऊन आम्ही आमची उत्पादने विकली होती. दुबईलासुद्धा आम्ही उत्पादनांचे काऊंटर्स लावले आहेत. आता लवकरच सिंगापूर, थायलंड येथे प्रदर्शन भरवत आहोत. हे माझ्या एकटीच काम नसून हे टीमवर्क आहे.’ आता लायन्स क्लब ऑफ वसई युनिटच्या त्या प्रेसिडेंट आहेत. अधिकाधिक महिलांसाठी कार्य करण्याचे त्यांचे ध्येय आहे.