गुगलचा नवा आविष्कार

>> महेश कोळी

शालेय पातळीवर परीक्षेमध्ये सारांश लेखनाचा प्रश्न असतो. परिच्छेद वाचून त्याचे सारांश लेखन करावयाचे असते. त्याला अचूक मथळाही द्यावा लागतो. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आवडीचा आणि चांगले गुण मिळवून देणारा असतो. याच धर्तीवर आता गुगलने नवीन टूल बनवले आहे. पाच-पाच हजार शब्दांचा लेख वाचण्याऐवजी शंभर-दोनशे शब्दांत त्याचा मथितार्थ किंवा सारांश उपलब्ध करून देणारे ‘जनरेटिव्ह एआय’वर आधारित ‘एसईजी’ नावाचे टूल गुगलचा नवा आविष्कार मानला जात आहे. तथापि, यामुळे जगभरातील प्रकाशकांना चिंतेत टाकले आहे. काय आहे हे टूल? यामुळे प्रकाशक का चिंतेत आहेत?

शालेय पातळीवर मराठी किवा इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये सारांश लेखन किंवा ब्रिफ यावर एक प्रश्न असायचा. पॅरेग्राफ वाचून त्याचे सारांश लेखन करण्यास सांगितले जायचे. त्याला अचूक मथळाही देणेदेखील आवश्यक होते. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न आवडीचा आणि चांगले गुण मिळवून देणारा असायचा. यावरून विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचपणी व्हायची. याच धर्तीवर आता गुगलने नवीन टूल बनवले आहे. पाच-पाच हजार शब्दांचा लेख वाचण्याऐवजी शंभर -दोनशे शब्दांत त्याचा मथितार्थ किंवा सारांश उपलब्ध करून देणारे ‘एसईजी’ हे टूल गुगलचा नवा आविष्कार मानले जात आहे.

गुगलकडून आता सर्च इंजिनमध्ये ‘एसजीई’ टूलचा वापर केला जात आहे. त्यामुळे अनेक प्रकाशकांची झोप उडाली आहे. सध्या हे टूल भारत, जपान आणि अमेरिकेत प्रायोगिक पातळीवर उपलब्ध आहे. गुगलचे हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर कदाचित आपल्याला संपूर्ण बातमी किंवा लेख वाचण्याची गरज भासणार नाही. आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर आधारित गुगलचे हे टूल इंटरनेटवर कोणत्याही विषयावर आधारित सामग्रीचे आकलन करत कमी शब्दांत एखादा सारांशात्मक परिच्छेद आपल्यासमोर मांडते. गुगलच्या या नव्या टूलमुळे जगभरातील मोठमोठी मीडिया हाऊसेस आणि बातमीचा स्रोत असणाऱया संस्थांत खळबळ उडाली आहे. या जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर गुगल आणि अन्य एआय पंपन्या करत आहेत. हे तंत्रज्ञान जुनी साहित्य संपदा आणि आकडेवारी गोळा करत नवीन सामग्री तयार करू शकते.

मे महिन्यात गुगलने जनरेटिव्ह एआयवर आधारित सर्चला बाजारात आणले. अर्थात मीडिया विश्लेषक आणि प्रसारकांकडून अगोदरच या तंत्रज्ञानावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कारण हे ओपन एआय चॅटजीपीटीपेक्षाही एक पाऊल पुढे टाकणारे आहे. चॅटजीपीटी हे प्रश्नांना उत्तर देणारे एआय ऑप्लिकेशन आहे; पण हे नवे टूल उपलब्ध सामग्रीचा सारांश दाखवणारे आहे.

सर्व काही होम पेजवर

नवीन टुलला गुगलने सर्च जनरेटिव्ह एक्सपीरियन्स (एसजीई) असे नाव दिले आहे. ‘एसजीई सर्च’ हे एखाद्या प्रश्नाचे उत्तर देताना आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करते आणि त्या उत्तरासाठी उपलब्ध पर्यायांचा सारांश काढून आपले स्वतःचे उत्तर तयार करते. गुगलकडून हे टूल अजूनही चाचणीच्या पातळीवर आहे. त्यानुसार हे टूल कितपत योग्य ठरते, याचे आकलन केले जात आहे. एसजीईकडून तयार केलेला सारांश लेख गुगल सर्चच्या होम पेजवर दिसतो आहे. त्याचबरोबर ‘डिग डिपर’ म्हणजे अगदी सखोलपणे जाण्यासाठीदेखील लिंक दिलेली आहे. त्यास क्लिक करून त्या विषयासंदर्भात आणखी सविस्तरपणे जाणून घेता येणे शक्य राहणार आहे. जर एखादा प्रकाशक आपली सामग्री एक्सक्लुसिव्ह करू इच्छित असेल तर ते या पर्यायाचा वापर करू शकतात. त्यानुसार त्याचे साहित्य एसजीईकडून तयार केलेल्या संक्षिप्त रूपात दिसणार नाही. मात्र या पर्यायाचा वापर करताच त्याची सामग्री गुगल सर्च रिझल्टवरूनही गायब होईल. म्हणजेच ती इंटरनेटवरही दिसणार नाही.

कसे काम करते एसजीई

उदा. जर आपण गुगलवर सर्च केले की, जॉन पह्से कोण आहेत? या वर्षी साहित्याचा नोबेल जिंकणारे लेखक जॉन पह्से यांच्याबाबत तीन पॅरेग्राफ एवढा लहान लेख एसजीईवर दिसेल. त्याचबरोबर विकीपीडिया, एनपीआर, न्यूयॉर्क टाइम्स आणि अन्य संकेतस्थळाची लिंक दिसू लागेल. या ठिकाणी पह्सेबाबतच प्रकाशित झालेले लेख असतील. मात्र तीन पॅरेग्राफ वाचल्यानंतर या लिंक्सला क्लिक करण्याची संख्या कमी होईल, अशी शक्यता आहे. गुगलच्या मते, एसजीईकडून तयार होणारी ही सामग्री अनेक संकेतस्थळाचा आधार घेऊन तयार केली जाते आणि त्याचबरोबर त्या संकेतस्थळाचे संदर्भदेखील दिले जाते. पंपनीच्या मते, एसजीई ही वाचकांसाठी प्रयोगात्मक पर्याय आहे आणि वर्तमानपत्रांच्या प्रकाशकांकडून आणि अन्य संबंधित लोकांकडून या नवीन टूलबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली जात आहे. एसजीई सध्या अमेरिका, भारत आणि अमेरिकेत जारी केले आहे. मात्र प्रकाशकांसाठी हे नवीन टूल धोक्याची घंटा राहू शकते. अगोदरच ते आपल्या सामग्रीच्या वापरावरून अनेक काळापासून गुगलशी संघर्ष करत आहेत. कारण बहुतांश बातम्यांची संकेतस्थळे ही आपल्या सामग्रीच्या प्रचारासाठी गुगल सर्चवर अवलंबून आहेत.

प्रकाशक काळजीत

अनेक प्रकाशकांनी एसजीईबाबत चिंता व्यक्त केली आहे. एसजीईकडून तयार केलेल्या सारांश लेखात प्रकाशकांना व्रेडिट दिले जाणार की नाही, ही एक मोठी चिंता आहे. याशिवाय त्या सारांश लेखाची खातरजमा हादेखील विचार करणारा भाग आहे. प्रकाशकांची इच्छा आहे की, तयार केलेल्या सामग्रीचा वापर एसजीईकडून केला जात असेल तर त्याचा मोबदला द्यायला हवा. मात्र चॅटजीपीटीच्या रूपातून अगोदरच प्रकाशकांना अशा आव्हानाचा सामना करावा लागत आहे. गुगलच्या प्रवक्त्याने दिलेल्या एका निवेदनानुसार जनरेटिव्ह एआयचा वापर हा जसजसा सर्चमध्ये वाढवत आहोत, तसतसे वाचकांना विविध स्रोतांकडे पाठवणे याकडे आमचे प्राधान्य राहील. यात वर्तमानपत्राचे प्रकाशकही सामील असतील. कारण आम्ही एक निकोप आणि सर्वव्यापी संकेतस्थळाचे पाठीराखे आहोत. ‘फॉरेस्टर रिसर्च’मध्ये सीनियर विश्लेषक निखिल लाय म्हणतात, एसजीई टूलमुळे प्रकाशकांच्या संकेतस्थळाला भेट देणाऱया लोकांची संख्या कमी होईल आणि त्यांना आपल्या सामग्रीच्या मूल्यांचे आकलन करण्यासाठी क्लिक रेटऐवजी नवीन पर्याय शोधावा लागेल. मात्र एसजीईमध्ये लिंक दिल्याने प्रकाशकांची विश्वासार्हता वाढेल, असे लाय यांना वाटते.