नाताळ,नवीन वर्ष आणि नवी स्वप्ने

>> प्रिया भोसले

माणसाचं आयुष्य कायमच आजच्यापेक्षा उद्याचा दिवस चांगला असेल या आशेवर अवलंबून असतं. मावळणारा सूर्य म्हणूनच आपण तन्मयेतेने पाहू शकतो, त्यातलं सौंदर्य अनुभवू शकतो कारण दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सुर्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्याकडे आशा म्हणून बघत असतो. अगदी तसंच नवीन वर्षाबाबतीत म्हणता येईल. सरणारं वर्ष त्यातल्या कडूगोड आठवणींचा तो भूतकाळ म्हणून सौम्य वाटत असतात. नाहीतर गेलेला पाच मिनिटापूर्वीचा क्षण पुन्हा जगायला आवडेल का विचार नकोसाच वाटणारा.

तसं भारतातल्या अठरापगड जातीधर्माचं नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी येत असलं तरी दिनांक एक जानेवारी मात्र जागतिक नवीन वर्षाचा पहिला दिवस समजला जात असल्यामुळे हा दिवस साऱ्यांसाठीच खास दिवस म्हणावा असा. नव्या वर्षातल्या नव्या दिवसाला घेऊन येणारी 31 डिसेंबरची रात्र आणि त्याआधी वातावरण निर्मिती करणारा ख्रिसमस तसेच वातावरण कुठे थंड तर कुठे बर्फाळ असणाऱ्या डिसेंबर महिन्याची मजा काही वेगळीच.

पूर्वी दूरदर्शनवर छायागीतमध्ये “आओ तुम्हे चाँद पे ले जाये” किंवा स्मिताचं “ओ मदरमेरी ,तेरी शरण में जो आये”,शानदार मधलं किशोरच्या आवाजातलं “आता है आता है सँन्टा आता है”,सारखी गाणी दाखवून नाताळची वातावरण निर्मीती होत असे. आज तसे ओटीटीवर नाताळवर आधारीत असलेल्या चित्रपटातून तो अनुभवायला मिळतो.

बॉलीवूडमध्ये जसं मुख्य सणांवर हिंदी गाण्यांचा पगडा आहे, तसाच इंग्रजी पिक्चर्सवर नाताळचा पगडा आहे. ही सुरूवात 1934 ला आलेल्या लॉरेल हार्डीच्या बेब्स इन टॉयलँड पासून झाली आणि मग ए ख्रिसमस कॅरल(1938), द शाॅप अराऊंड द कॉर्नर(1940), मीट मी इन सेंट लुईस (1944), इट्स ए वंडरफुल लाईफ (1946), मिरॅकल ऑन 34th स्ट्रीट (1947),ए ख्रिसमस स्टोरी (1983),एट विमेन (2001), कॅरल(2015), ते ख्रिसमस अॅज युज्वल (2023) पर्यंत ते अव्याहतपणे सुरूच आहे. यात लहांनासाठीही आलेल्या होम अलोन, द स्नोमॅन, द पोलार एक्सप्रेस,चार्ली अॅड चॉकलेट फॅक्टरी, हॅरी पॉटर, नार्नियापासून आगामी दॅट ख्रिसमस चित्रपटात नाताळचं अस्तित्व आपल्याला ठळकपणे दिसतं. अर्थात यातील होम अलोनसारखा चित्रपट लहानथोर असा भेदभाव न करता, साऱ्याच वयोगटातील लोकांचा आवडता ठरतो ही गोष्ट अलहिदा. आजही ख्रिसमसची वातावरणनिर्मीती करणाऱ्या होम अलोनची जादू अबाधित आहे. घरात एकटं अडकलेल्या मुलाने आधी एकांत मनसोक्त अनुभवल्यानंतर चोरांचा डटके सामना करत चोरी होण्यापासून वाचवून मग घरच्यांच्या आठवणीने व्याकूळ होणं बघताना वाटायचं ख्रिसमसचं निमित्त साधून कुटुंबासाठी इतका सुंदर संदेश देणारा चित्रपट असूच शकत नाही. असंच लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरीतही कुटुंबाचं महत्त्व पहायला मिळतं. कायम चॉकलेट फॅक्टरीत राहण्याचं अमिष धुडकावून लावत लहान चार्ली आपल्या आईबाबा आणि आजीआजोबांसमवेत छप्परतुटक्या घरात राहणं स्वीकारतो. सदैव रजयात गुरफटून गेलेले आजी आजोबा, बाहेर पडणाऱ्या बर्फामुळे सिनेमाची प्रत्येक फ्रेम इतकी छान वाटते की चित्रपट बघताना तुम्हाला ही त्या तुटक्या तरीही मायेच्या उबदार घरात रहायचा मोह होतो.

नाताळचं औचित्य साधून बॉलीवूडप्रमाणे हॉलीवूडनेही कधी कुटुंबव्यवस्थेचं तर कधी प्रेमाचं महत्त्व अधोरेखित केलयं. याचं उत्तम उदाहरण..प्रेमात अयशस्वी ठरलेल्या दोन अनोळखी स्त्रियांच्या आयुष्याला कलाटणी देणारा द हॉलिडे सारखा नितांत सुंदर सिनेमा. प्रेम बांडगुळासारखं आयुष्यात असेल, सुख कुणाची तरी मेहेरबानी म्हणून मिळत असेल तर त्या नात्यातून निघणं जरी महत्त्वाचं तरी ती वेळ येणं कठीणच.. “आवडत्या पुरुषाच्या आयुष्यात नेहमी leading lady बनून रहावं..त्याची मैत्रीण नाही. “हा प्रेमातला मौल्यवान संदेश देणारा ‘द हॉलिडे’ त्यातला नाताळसण आणि ते टुमदार गाव तुमच्या ख्रिसमस स्पेशल मुव्हीजमधे अग्रस्थान पटकावतो. शॉप अराऊंड द कॉर्नर(1940) पासून ते 2022 ला आलेला फॉलिंग फॉर ख्रिसमस पर्यंत हॉलीवूडने उत्तमोत्तम रोमँटिक चित्रपटांची नाताळसोबत सांगड घालून सणाचा आनंद द्विगुणीत केलेला दिसून येईल.

लेखाच्या निमित्ताने नाताळसोबत हिंदी चित्रपटातील नवीन वर्षावर आधारीत चित्रपट आणि गाणी शोधण्याचा प्रयत्न करताना लक्षात आलं अगदी हाताच्या बोटावर मोजावीत इतकीच हिंदी गाणी यावर उपलब्ध आहेत. या श्रृंखलेत पहिल्या गाण्याचा मान जातो ते 1954 ला आलेल्या सम्राट मधल्या “नया साल मुबारक हो” गाण्याला. नायक अजित आणि भारतीय तसेच पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केलेल्या आणि द क्वीन ऑफ चार्म आणि द डान्सिंग डॅमसेल ऑफ बॉम्बे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेहाना हिच्यावर गाणं चित्रित केले होते. तर त्याच वर्षी शमशाद बेगमच्या आवाजातलं 31 डिसेंबरला आलेल्या टुटे खिलौने चित्रपटातील “साल मुबारक आया है” हे दुसरं गाणं हि तितकंच गाजलं होतं.

त्यानंतर मात्र नविन वर्षाचं कौतुक करणारं गीत दिसलं ते थेट 1974ला आलेल्या राजकपूर आणि राजेंद्रकुमारच्या दो जासूस मधे, ज्यात “हॅप्पी हॅप्पी न्यु इयर टू यु” आणि “साल मुबारक साहेब जी” अशी दोन गाणी होती. हॅप्पी हॅप्पी न्यु इयर टू यु गाण्याची पार्श्वभूमी एका खूनाची असल्यामुळे गाण्यानंतर सिनेमा अधिक रंगतदार होतो. शेलेंद्रसिंगचा आवाज ,पार्टी माहौल, असं जरी असलं तरी चित्रपट फार चालला नसल्यामुळे ह्या गाण्याला तितकं महत्त्व मिळालं नाही.
जसं शैलेंद्रसिंगचं नशिब गायक म्हणून फळफळलं नाही तसाच नायक म्हणून अपयशी ठरलेल्या राजकिरण नावाचा देखण्या नटाच्या वाट्याला नवीन वर्षाचं एक अप्रतिम गाणं आलं. नीता मेहता नायिका असलेल्या नजराना प्यार का मधलं आशा भोसलेंनी गायलेलं “नया साल आये तमाशा दिखाये” ही तितकंच श्रवणीय, या दोघांमुळे प्रेक्षणीय होतं.

1981 च्या रक्षा सिनेमातलं “नये पुराने साल में एक रात बाकी है”आणि 1984 च्या जागिरमधलं “नया नया होता है पुराना पुराना” हि दोन गाणी फारशी गाजली नाही पण ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध गायक शब्बीर कुमारच्या आवाजातलं “नये साल का पहला जाम” आपके साथ मधलं अनिल कपूरवर चित्रित झालेलं गाणं मात्र बऱ्यापैकी गाजलं आणि त्याहीपेक्षा 1991 ला आलेल्या मणीरत्नम् यांच्या अंजली सिनेमातलं “आयेगा आयेगा 1991” हे छोट्या मुलांवर चित्रित झालेलं गाणं गाजलं. इतकी अफलातून नाचणारी लहान मुलं आजवर कोणत्याही चित्रपटात दिसली नव्हती .त्यामुळे अंजलीमधलं हे गाणं एका पिढीचं अत्यंत लाडकं आणि अविस्मरणीय गाणं ठरलं.बाकी त्यानंतर 1991 ला बहारों कि मंझिलसारख्या कधी आला कधी गेला कळलं नाही कॅटेगरीतल्या सिनेमातलं आधी “रात आयी तो खयाल आया” हे नवीन वर्षावर आधारीत गाण्याच्या वर्गात आलेलं शेवटचं गाणं म्हणू शकतो.

यात काही नवीन वर्षाचा उल्लेख नसलेली तरी त्याला उद्देशून असणारी पार्टीसाँग्स चित्रपटात दिसली. सिप्पींचा अंदाजमध्ये “दिल उसे दो जो जान दे दे,जान उसे दो जो दिल दे दे” गाण्यात नव्या वर्षाचं स्वागत बघायला मिळतं. साथीदार गमावून बसलेल्या, आयुष्य फक्त आपल्या मुलांच्या अवतीभोवती ठरवून असणारया हेमा,शम्मीची पार्टीतली ओळख आयुष्यातला एकटेपणा संपवून टाकत नव्या आयुष्याची नांदी ठरते.

तर जूलीमधलं नाताळचं औचित्य साधून राजेश रोशनचं म्युझिक असलेलं “ये राते नयी पुरानी आते जाते केहती है कोई कहानी” गाणं चित्रपटातील इतर गाण्यांसोबत सुपरहिट झालं.एक वर्ष संपता संपता प्रेमाच्या मौसमची बहारदार सुरूवात करणारं हे गीत,एकमेकांबद्दल वाटणारी ओढ अधोरेखित करते. हातात दिवा घेऊन त्या प्रकाशात फक्त एकमेकांना बघत, विलक्षण माहौल अनुभवताना, लताबाईंचा स्वर्गीय आवाजात,”आ रहा है देखो कोई, जा रहा है देखो कोई” ह्यातून नवं आणि जुन्या वर्षासोबत नायिकेचा मित्र आणि प्रियकर ह्या दोघांचं तिच्या आयुष्यातलं स्थान सूचित करतं.

असंच प्रांसगिक नवीन वर्षाचं चित्रण रणबीर दिपीकाच्या ‘ये जवानी है दिवानी’त बघायला मिळतं. ओळख, आकर्षण आधीच असूनही प्रेम व्यक्त न करणाऱ्या नायकाला, आपलं अमूल्य असं काही दुसऱ्याचं होऊ पाहतयं याची जाणीव होते मग नात्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी निमित्त ठरते सरत्या वर्षाची रात्र, इकरार झाल्यावर आनंद शेयर करताना चार मित्र वेगवेगळ्या ठिकाणी असूनही फोनवर नव्या वर्षाचं स्वागत करतात. इथे तसं कोणत्याही गाण्याचा साज नसतानाही, पाचवा मित्र म्हणून नव्या वर्षाचं अस्तित्व दिसतं.

तसं आयुष्य आणि आठवणी हा न तुटणारा धागा आहे. सुखाच्या आठवणींच्या जीवावर वर्तमानकाळ सुसह्य करण्याची ताकद आहे तरीही वर्ष संपायला आलं कि सरत्या वर्षाला निरोप देऊन येणाऱ्या वर्षाचं स्वागत करायची माणसाची वृत्ती, त्याचं प्राप्त परिस्थितीत खचून न जाता स्वप्न पाहण्याची उमेद दाखवतात. माणसाची स्वप्ने तरी काय असतात… मिळवायचा ध्यास लागून मनाच्या,मेंदूच्या कप्प्यात जागा अडवून असलेला झांगडगुत्ता.स्वप्न सुखाभोवती घुटमळत असतील तर आयुष्य कायम गुंतलेलं.

एक जानेवारी म्हणजे एकापरीने स्वप्नच..

जशी स्वप्ने नसती तर आयुष्य उद्दिष्ट रहित असतं तसंच संगीत नसतं तर आयुष्याचा सफर हि सुहाना झाला नसता.म्हणूनच आपल्या आयुष्यात संगीताचं स्थान अनन्यसाधारण आहे.अशा ह्या संगीतमय, सुमधूर स्वप्न लाभलेल्या नूतन वर्षाच्या, सामनाच्या वाचकांना उदंड शुभेच्छा!

(लेखिका सिनेसमिक्षक आहे )