साहित्यजगत- आठवणींची उजळणी

>> रविप्रकाश कुलकर्णी

आज 13 ऑगस्ट, आचार्य अत्रे यांची 125 वी जयंती. तसं बघायला गेलं तर रोजच कुणाची तरी जयंती वा पुण्यतिथी असतेच असते, पण त्याची दखल घेतली जाते? मात्र आचार्य अत्रे यांच्या बाबतीत असं होत नाही. कारण आचार्य अत्रे यांनी मराठी जगतासाठी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे की, ते विसरणं कठीण. एका अत्र्यांमध्ये किती अत्रे असावेत? ते लेखक होते, कवी होते, नाटककार होते, चित्रपट निर्माते होते, दिग्दर्शक होते, ओजस्वी वत्ते होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात मुलूखमैदान तोफेसारखी कामगिरी बजावणारे ‘मराठा’ वर्तमानपत्राचे संपादक होते. अशी आचार्य अत्रे यांची रूपे पाहिली की, थक्क व्हायला होतं.

आचार्य अत्रे कसे होते हे सांगणारी दोन प्रातिनिधिक अशी मतं देतो. ना. सी. फडके यांनी म्हटलं आहे की, “अत्र्यांइतकी अमाप लोकप्रियता गेल्या अर्धशतकात दुसऱया कोणत्याही साहित्यिकाने मिळवलेली नाही. त्यांच्या इतके ऐश्वर्य आणि वैभवही कुणाला लाभलेलं नाही. अत्र्यांच्या जीवनाइतकं बहुरंगी आणि बहुढंगी जीवन दुसऱया कोणत्याही मराठी साहित्यिकाचं झालेलं नाही”, तर अत्र्यांचे एकेकाळचे विरोधक पु.भा. भावे यांनी आचार्य अत्रे गेल्यानंतर म्हटलं होतं की, माझं अत्र्यांशी वैयक्तिक वैर कधीच नव्हतं. होतं ते केवळ एक तात्त्विक भांडण! भांडत असताना अत्र्यांच्या अंगी असलेल्या अनेक मोठय़ा गुणांची पूर्ण जाणीव माझ्या ठिकाणी होती. आज तर ती जाणीव अधिकच तीव्रतेने माझ्या ठिकाणी जाणवत आहे. कारण अत्र्यांची जागा घेईल असे आज या उभ्या महाराष्ट्रात मला दुसरे कोणी दिसत नाही. तेव्हा आता पुढील पिढीने केवळ अत्र्यांच्या अंगी असलेल्या गुणांचे स्मरण ठेवायचे आहे.”

अत्र्यांच्या लौकिकाला साजेसं स्मारक महाराष्ट्रात सोडा, मुंबईत तरी आहे काय? त्यामुळेच आचार्य अत्रे यांच्या नातवाने म्हणजे अॅडव्होकेट राजेंद्र पै यांनी आता तरी 125 व्या जयंतीनिमित्ताने त्याची पूर्तता करावी अशी मागणी वा इच्छा व्यक्त केली आहे ती रास्तच आहे. तमाम महाराष्ट्रीयन माणसांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा.

आचार्य अत्रे यांचं खरं स्मारक म्हणजे ‘दैनिक मराठा’ आणि हे वर्तमानपत्र ज्या वास्तूत होतं ती ‘शिवशक्ती’ वास्तू. दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी अस्तित्वात नाहीत. ‘मराठा’ बंद पडला आणि त्यानंतर ‘शिवशक्ती’देखील गुजराती मंडळींनी विकत घेतली. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला किंवा संस्थेला हे शक्य नव्हतं काय? याला दुर्दैव म्हणायचं की शोकांतिका?

हे सगळं जाणून घेण्याकरिता मी त्या गुजराती मंडळींना भेटलो होतो. तो व्यवहार त्यांनी मोकळेपणाने सांगितला, पण हे ऐकून मन विषण्ण झाले. मी जायला निघालो तेव्हा त्यांच्यातील एक प्रमुख व्यक्ती मला म्हणाली, “आचार्य अत्रे तुमचे होते ना? मग तुम्हा मराठी लोकांना त्यांचं मोठेपण कळलंच नाही. त्यांच्यापेक्षा निम्मी बुद्धिमत्ता असलेला माणूस आमच्या गुजराती मंडळीत असता तर त्याचा आम्ही सोन्याचा पुतळा करून त्याचं स्मारक केलं असतं!” त्यावेळी ‘आचार्य अत्रे यांचे स्मारक अर्धपुतळा असावा की पूर्ण?’ असा काहीतरी वाद चालला होता. त्याचा या बोलण्याशी संदर्भ होता.

पुढे आचार्य अत्रे यांचा वरळी सीफेसकडे जाताना लागणाऱया रस्त्याच्या कोपऱयावर पेट्रोलपंपाच्या इथे अर्धपुतळा झाला. नंतर त्या खासगी जागेतून हा पुतळा वरळी नाक्याच्या चौकात आला. या अर्धपुतळ्याऐवजी पूर्ण पुतळा असावा याबाबत बरीच भवती न भवती झाली, पण एकदाचा पूर्णाकृती पुतळा वरळी नाक्याच्या चौकात उभारला गेला. आजही तो आहे, पण झालंय असं की, हा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे असं बहुतेकांना वाटतं.

यावरून आठवलं, आचार्य अत्रे यांच्या पत्नीचं माहेरचं नाव ‘मुंगी’ होतं, तर जावयाचं आडनाव ‘पै’ होतं. त्यावरून अत्र्यांची त्या काळी थट्टादेखील झालेली आहे. अत्रे यांना ही बोच बहुतेक असणार. त्यामुळे असेल, त्यांच्या एका नातवाचं नाव त्यांनी ‘पामादित्य’ असं ठेवलं. तेव्हा शिरीष पै त्यांना म्हणाल्या, “पपा, एवढं मोठं नाव कशाला?” तेव्हा आचार्य अत्रे म्हणाले, “नाव कसं घसघशीत हवं. लिहितानादेखील भारदस्त वाटलं पाहिजे.”

खुद्द आचार्य अत्रेदेखील नेहमी आपली स्वाक्षरी प्रल्हाद केशव अत्रे अशी जोरदार करत असत. सांगायचं तात्पर्य इतकं की, आचार्य अत्रे यांचं स्मारक असं तोलामोलाचंच हवं, जोरदार हवं.

“संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा आग्रह आचार्य अत्रे यांचा होता. आचार्य अत्रे यांच्या स्मारकाबाबत “झालंच पाहिजे” असं निदान म्हणू शकतो की नाही? मराठी माणसांच्या इच्छाशक्तीपुढे हे घडेलसुद्धा. ‘होतं’ म्हटलं की, ‘घडतं’ असं म्हणतात. ते आता घडावं.