शिरीषायन – गतसालचा गोड गुलदस्ता!

>> शिरीष कणेकर

हेही वर्ष सरलं. म्हणजे बावीस साली जगातून प्रस्थान नव्हतं तर. याव्यतिरिक्त काही चांगली गोष्ट घडली का? पटकन आठवत तरी नाही.

नाही म्हणायला ऑगस्टमध्ये माझ्या पँटचं बटण तुटूनही ती खाली घसरली नाही. बायकोचं म्हणणं असं होतं की, त्या पँटचं कापड लग्नात तिच्या माहेरच्यांकडूनच मला दिलं गेलं होतं. पँट शिवली तिच्या सासरकडच्या शिंप्यानं. म्हणून बटण तुटलं. बटणानं गमावलं ते पँटच्या कापडानं निभावलं.

कापडाबरोबर मला एक रुमालही मिळाला होता. पण डोक्यावर कावळा शिटला तर बायको मला ते त्या रुमालानं पुसू देत नाही. त्यातून नेम धरून डोक्यावर प्रसाद देणारे सगळे कावळे मोजून नवऱयाकडचेच असतात. आता मी कावळय़ांचं आधारकार्ड बघणारच आहे. काय चावटपणा लावलाय? परवा स्वयंपाकघरात घोण निघाली तर आमची ही तिला चक्क वन्सं म्हणाली. मी घाबरत नाही. ही माहेरी गेलेली असताना मी एकदा पांघरुणातल्या पांघरुणात तिच्या आईला म्हैस व बापाला पाणघोडा म्हणालो होतो. तरी तिच्या भावाला सुरवंट म्हणायचं राहूनच गेलं.

गेल्या वर्षी घडलेली आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, संगमनेरहून एक निष्ठावंत वाचक मला भेटायला आला. कुठलंही प्रेम जसं निस्सीम असतं, सासू जशी ढालगज असते, प्रयत्न जसा प्रामाणिक असतो, औषध जसं गुणकारी असतं, कुमारिका जशी अनाघ्रात असते, म्हातारा जसा जख्खं असतो तसा वाचक हा नेहमी निष्ठावंत असतो. माझ्याकडे अशा निष्ठावंत वाचकांची फौज आहे.

संगमनेरचा वाचक म्हणाला, ‘मी तुमचा फॅन आहे. म्हणून मी घरात पंखा लावलेला नाही.’
वाचकाचा तथाकथित विनोद मी पचवला. ते नाही का नेहमी माझे पचवत?
‘संगमनेरच्या जागृक वाचकांचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय.’
‘ऑल द वे?’ मी कौतुकानं विचारलं.

‘हो. तसं शेजारच्या बिल्डिंगमध्ये मला अमसुलं पोहोचवायची होती. म्हटलं डोकावूया व तुम्हाला निरोप देऊया. संगमनेरकरांचा आग्रह आहे की, तुम्ही लेखनसंन्यास घ्यावा. अति झालं. बाय द वे तुम्ही कोणत्या नावानं व काय लिहिता?’

त्याची संगमरवरी कबर बांधायची मला तीव्र इच्छा झाली. निष्ठावंत वाचक म्हणवतो साला. कुठल्या नावानं लिहितो म्हणे? सांगावं का पु. ल. देशपांडे म्हणून? की थेट ज्ञानेश्वर सांगू? राम गणेश गडकरी काय वाईट आहे? शिवाय जातवाले आहेत. ‘यावर तुमचं काय उर्मट मत आहे?’ हे अप्रतिम वाक्य त्यांचंच… मी कसंबसं त्याला घरातून बाहेर काढलं. उंदराला बाहेर काढतानाही मला इतके कष्ट पडले नव्हते. तुम्ही विचाराल की, या वाचकाची गतसाली झालेली भेट ही चांगली गोष्ट कशी? बाबांनो, आमसुलाचं एक पाकीट तो माझ्या घरी विसरून गेला होता. आता अमसूल संपेल तेव्हा त्याची आठवण येईल. आणखी काही तो आणून विसरू शकेल का हे पुढल्या भेटीत विचारावं लागेल. पण एकदा निरोप दिल्यावरही मी लिहायचा थांबत नाही हे पाहून तो धमकी द्यायला किंवा मारायलाच येईल. मग अमसुलं मला केवढय़ाला पडतील? मला तरी कसली ही जिवावर उदार होऊन लिहायची खाज? वाचत तर कोणी नाही. उद्या अमसुलं विकायला दुसरा कोणी आला तर तो निष्ठावान वाचक निघायचा या विचारानं मला कापरं भरेल. लेखनाला मी सुरुवात केली तेव्हा त्याचं अमसुलाशी इतका घनिष्ट संबंध असेल याची मला कल्पना नव्हती. दुकानातही अमसूल माझ्या लेखनाच्या हस्तलिखितात बांधून विकत असतील का? तरीच माझ्या लेखनाला किंमत आहे असं मला वाटत आलंय ते! तरीच माझी पुस्तके पुस्तकाच्या दुकानात नव्हे तर वाण्याकडे विकली जात असावीत. कोऱया पुस्तकाचे एकेक पान फाडून अमसुलांसमवेत ते विकले जात असावे. नुसती अमसुलं कशी विकणार? नुसतं पुस्तकाचं पान कोण विकत घेणार? ते शंकर-जयकिशनप्रमाणे किंवा लैला-मजनूप्रमाणे किंवा राम-सीतेप्रमाणे पिंवा लॉरेल-हार्डीप्रमाणे किंवा मोदी-शहांप्रमाणे एकत्रच जातात. त्यांचा स्वतंत्र, वेगळा-वेगळा विचार होऊच शकत नाही. ‘त्यांचे अमसुलासमान लेखन’ असा माझा पुढेमागे यथोचित गौरव होऊ शकेल.

संगमनेरला मात्र कधी जायचं नाही हं. नको रे बाबा. मी कितीही वाईट लिहीत असलो तरी जीव प्यारा आहेच की मला…

[email protected]