Family Stores ग्राहकांच्या तिसऱ्या पिढीचे साक्षीदार

>> उत्तरा मोने

दादर स्टेशनच्या बाहेर घरगुती खाद्यपदार्थांपासून ते पूजेच्या सामानापर्यंत आणि स्टेशनरीच्या सामानापासून गणपतीत अगदी गणेशमूर्तीपर्यंत आपल्या घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात ते आहे फॅमिली स्टोअर्स. नावाप्रमाणेच कुटुंबाचे दुकानगेली 77 वर्षे मराठी वस्ती प्रामुख्याने असणाऱ्या दादरमध्ये दिमाखात उभे आहे.

1946 साली शिवराम विश्वनाथ ऊर्फ आप्पा जोशी यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी फॅमिली स्टोअर सुरू केले. त्या वेळी त्यांच्याकडे ना पैसा, ना जागा, ना कुणाचे पाठबळ, पण केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे दुकान घेतले आणि अनेक प्रसंगांना तोंड देत यश, कीर्ती मिळवून ते नावारूपाला आणले. मुंबईच्या जीवनात महिलांना नोकरीमुळे खाद्यपदार्थ बनवायला वेळ मिळत नाही ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी गरजू महिलांकडून घरगुती चवीचे खाद्यपदार्थ ठेवायला सुरुवात केली आणि हा व्यवसायाच्या वाढीसाठी क्रांतिकारक टप्पा ठरला.

व्यवसायात जम बसवताना त्यांनी अनेक कल्पना लढवल्या. गणेशमूर्ती, संक्रांतीला हलव्याचे दागिने, दिवाळी फराळ असे हंगामी व्यवसाय सुरू केले. जोडीला घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पीठे, भाजण्या, पूजा साहित्य अशा वस्तूंमुळे ग्राहकांची वर्दळ वाढली. पश्चिम रेल्वेच्या विरार व मध्य रेल्वेच्या बदलापूरपर्यंत राहणारे असंख्य ग्राहक नेमाने त्या वेळी
फॅमिली स्टोअर्समध्ये येऊ लागले. आज फॅमिली स्टोअर्समध्ये ग्राहकांची तिसरी पिढीही खरेदीकरिता येते. आता फॅमिली स्टोअर्सचीही तिसरी पिढी या व्यवसायात आहे. आप्पा जोशी यांचा मुलगा शेखर जोशी, त्यांची पत्नी कलाताई, त्यांची दोन्ही मुले अभिजीत आणि योगेश सगळे या व्यवसायात आहेत.

1975 साली फॅमिली स्टोअर्सच्या शेजारची जागा आप्पांनी हिमतीने विकत घेतली. तिथे फॅमिली स्टेशनरी मार्ट या नावाने  चित्रकलेचे साहित्य, ऑफिस स्टेशनरी, आर्ट आणि क्राफ्ट मटिरिअलचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. 10 वर्षांपूर्वी आप्पांचा नातू अभिजीतने केतकी ओव्हरसीज ही कुरीअर कंपनी सुरू केली. त्यामार्फत फॅमिली स्टोअर्सची दिवाळीच्या फराळाची गिफ्ट हॅम्पर वेगवेगळ्या देशांत पाठवली जातात. ज्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

आयुष्यात दोन छंद आप्पांनी मनमुराद जोपासले ते म्हणजे माणसे जोडणे आणि दुसऱ्याला मदत करणे. या दानशूरपणातून त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांनाही मदत केली. फॅमिली स्टोअर्स हे आपले नाव सार्थ ठरवते. शेखर जोशी म्हणाले, ‘‘कोरोना काळात आम्ही होम डिलिव्हरी सुरू केली. ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू ठेवली आहे.’’  येत्या काळात संस्कारांच्या पाठबळावर ग्राहकांच्या येणाऱया पुढच्या पिढय़ाही या कुटुंबाशी जोडलेले राहतील असे निश्चित वाटते.