World Cup 2023 – आजपासून हिंदुस्थानात सबकुछ क्रिकेट!

>> द्वारकानाथ संझगिरी

विश्वचषकाचा बिगुल आज वाजवला जाईल. 8 तारखेला चेन्नईला हिंदुस्थानी संघ आपला ‘पांचजन्य’ शंख फुंकेल आणि मग भारतवर्ष काही काळ क्रिकेटमय होईल. क्रिकेट पुढल्या बाकावर असेल. सांगायचं तर सबकुछ क्रिकेट असेल. काहीतरी असामान्य, अघटित घडल्याशिवाय राजकारण, सिनेमा वगैरे गोष्टी पहिल्या बाकावर येणार नाहीत. अशा वेळी एका प्रश्नाची चर्चा ट्रेनमध्ये, नाक्यांवर, कट्टय़ांवर, मित्रांमध्ये होत रहाते.

कोण जिंकणार?

अशा स्पर्धेचं भाकीत करणं हे सलमान खानची पुढची मैत्रीण कोण याचं भाकीत करण्याएवढं कठीण आहे. क्रिकेटमधे बऱयाचदा लॉजिक, मागचा इतिहास, आजचा फॉर्म, खेळाडूचा दर्जा वगैरे गोष्टीसुद्धा भाकिताच्या उदरात नेमपं कुठलं ‘बाळ’ आहे हे सांगू शकत नाही. 1983 साली कुणाला वाटलं होतं की, भविष्याच्या गर्भात हिंदुस्थानी संघ नावाचं बाळ आहे? तीच गोष्ट 1992 ला पाकिस्तानची.

पण संघाची निवड, हिंदुस्थानी वातावरणाचा दबाव, संघाची ताकद, अनुभव, जिंकण्याची सवय या गोष्टींचा ऊहापोह केला तर मला हिंदुस्थान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीत अपेक्षित आहेत.इंग्लंडचा संघ ताकदवान आहे. मुख्य म्हणजे तो वेगळय़ाच ब्रॅण्डचं आक्रमक क्रिकेट खेळतोय.

त्यांच्याकडे ‘बेन स्टोक्स’ नावाचा परिकथेतला दिवा घासल्यावर येणारा राक्षस आहे. तो बऱयाचवेळा बॅटने आणि क्वचित प्रसंगी बॉलने फक्त पेट्रोल नाही तर पाणीही पेटवतो. जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे ऐन कठीण प्रसंगात असामान्य खेळी खेळून जातो. त्याला मोठय़ा स्टेजचं वगैरे मानसिक भय नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे आक्रमक फलंदाजांची फळी आहे, समतोल गोलंदाजी आहे. त्यात दर्जेदार वेगवान गोलंदाज आले आणि फिरकी गोलंदाजसुद्धा. मुख्य म्हणजे ‘शेपूट’हा प्रकार त्यांच्या फलंदाजीला असलंच तर नुकतीच मुंज झालेल्या लहान मुलाच्या शेंडीएवढी आहे.

दबाव असेलच, पण जोशही आहे! कर्णधार रोहित शर्माचा आत्मविश्वास

इंग्लंडचा वोक्स आठव्या क्रमांकावर खेळतो. त्याची वन डेतील सरासरी 80 सामन्यांत 24.43 आहे. नवव्या क्रमांकावर आदिल राशीद येतो. 56 खेळीत त्याची सरासरी 18.82 आहे आणि स्ट्राईक रेट 100.

ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे ज्याला जिंकायची सवय आहे. या स्पर्धेत ते पाच वेळा चॅम्पियन झाले आहेत. बरं ते आयपीएलमधे हिंदुस्थानात खेळतात. त्यामुळे हिंदुस्थानी खेळपट्टय़ांचा अनुभव त्यांना आहे. हिंदुस्थान हे त्यांचं ऑस्ट्रेलियाबाहेरचं होम पिच आहे. ते कठीण परिस्थितीतून सामना फिरवू शकतात. न्यूझीलंडकडे विल्यम्सन सोडला तर दुसरा सुपरस्टार नाही, पण त्यांची सांघिक भावना सर्वोच्च आहे.

World Cup 2023 –  सलामीलाच लाखमोलाचे द्वंद्व, जगज्जेते भिडणार स्मार्ट न्यूझीलंडशी