वेब न्यूज – आकाशातील सोन्याची खाण

चांद्रयानाची मोहीम यशस्वी झाली आणि आकाश, ग्रह-तारे, खगोलशास्त्र हे सगळे विषय पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले आहेत. या सगळ्यामध्ये विविध ग्रह, त्यावर मानवासाठी उपयोगी काय काय आहे, कुठल्या ग्रहावर हिरेमाणकांचा पाऊस पडतो असे सगळे विषयदेखील चवीने चर्चेला आले. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय होता की, कुठल्या ग्रहावर सगळ्यात जास्त मौल्यवान धातू किंवा रत्ने आहेत? आणि खगोल अभ्यासकांनी त्याचे उत्तर दिले 16 Psyche लघुग्रह.

बटाटय़ाच्या आकाराचा हा ग्रह पूर्णपणे सोन्याने भरलेला आहे. 1 मार्च 1852 रोजी इटलीचे खगोलशास्त्रज्ञ ऑनिबल डी गॅस्परिस यांनी या ग्रहाचा शोध लावला. सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने या ग्रहाचा अभ्यास केला जात होता. आता शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, या ग्रहावर इतक्या मुबलक प्रमाणात सोने उपलब्ध आहे की, ते जर पृथ्वीवर आणता आले तर पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस अरबपती होईल. अर्थात सोन्याचा भाव मातीत मिसळेल हा भाग वेगळा. या ग्रहावर यान पाठवले जाणार असल्याची चर्चा रंगलेली होती, पण सध्या तरी तसे काही घडताना दिसत नाही. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मध्ये फिरणाऱया या लघुग्रहाचा गाभा लोखंड आणि निकेल यांनी बनलेला आहे. या ग्रहावर सोन्याच्या सोबत प्लॅटिनम आणि इतरही मौल्यवान धातू उपलब्ध आहेत हे विशेष. खरे तर असे 16 ग्रह आजवर शोधण्यात आले आहेत, ज्यावर सोन्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र, 16 Psycheवरचा सर्व सोन्याचा आणि इतर मौल्यवान धातूंचा साठा पृथ्वीवर आणता आला तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला 100 अब्ज डॉलर्स मिळू शकतील. 2013 मध्ये नासा या ग्रहावर यान पाठवण्याची तयारी करत होता. अर्थात, तिथला खजिना मिळवणे नाही, तर ग्रहाचा अभ्यास करणे हा उद्देश होता. ऑक्टोबरमध्ये नासा परत ही मोहीम राबविण्याच्या विचारात आहे. 2030 मध्ये हे यान त्या ग्रहावर पोहोचेल.