लेख – मणिपूरः देश अराजकाच्या उंबरठय़ावर

>> नरेंद्र डुंबरे

मैतेई निपुण या संघटनेमुळे जे धार्मिक जातीय ध्रुवीकरण राज्यात झाले त्याची परिणीती ही आजची परिस्थिती आहे. या संघटनेला संघाचे पाठबळ आहे. आज तिथे कुकी आणि मैतेईघेटोपद्धतीने राहू लागले आहेत. त्यांच्यामध्येबफर झोनतयार झाले आहेत. जे देशपातळीवर संघ प्रणित संघटनांनी हिंदूमुस्लिमांमध्ये घडवून आणले आहे. या देशातीलगंगा जमुना संस्कृतीला या विचारधारेने तिलांजली दिली आणि देशाला अराजकाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे.

या देशात पुन्हा महाभारत घडत आहे काय? इतिहासात दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला, कौरव उन्मादित होते. दुसऱ्या बाजूला पांडव शोकमग्न; तर भीष्माचार्य द्रोणाचार्यादि वरिष्ठ गण चिंताग्रस्त, शर्मित झालेले होते. त्यांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. संपूर्ण सभा संमिश्र भावनेने ओथंबलेली असताना; आक्रोशीत द्रौपदीला कृष्णाचा धावा सावरून गेला. कृष्णाने निरंतर वस्त्र पुरवून द्रौपदीचे शील संवर्धित केले. आजच्या द्रौपदींचे काय? कोणता कृष्ण त्यांना वाचवणार? आजची कथा आणि व्यथा मणिपूरमधली आहे. गेल्या 75 ते 80 दिवसांपासून मणिपूर जळत आहे आणि देशाचे तथाकथित अध्वर्यू जगभर हारतुरे, सन्मान घेत फिरत आहेत. देशात आल्यानंतर पाच राज्यांतील आगामी निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य जळत्या मणिपूरला थंड करण्याचे आहे, पण राज्यकर्त्यांनी निव्वळ डोळ्याने नाही तर भावनेने, धोरणाने आंधळेपण स्वीकारलेले आहे.

मणिपूर भारताच्या पूर्वोत्तर राज्यांपैकी एक छोटेसे राज्य. फार तर 50 – 60 लाखांची वस्ती असेल. ते राज्य आज अराजकाच्या कडय़ावर आहे. या विद्यमान सत्तेचा प्रभाव असाच राहिला; तर अशान्त मणिपूर भविष्यातील भारताचे लघुरूप ठरू नये! देशासाठी ही धोक्याची घंटा मणिपूरमधून वाजली आहे. मणिपूरची भौगोलिक स्थिती कशी आहे? तर 80 टक्के डोंगर आणि जंगल प्रदेश. जिथे कुकी आणि नागा या आदिवासी जमाती राहतात. उर्वरित 20 टक्के हा खोऱ्याचा भाग आहे, त्यामध्ये मैतेईं जमातीचे लोक राहतात. गेल्या पाच-पन्नास वर्षांपासून संघाचे लोक तिथे कार्यरत आहेत; ते नेमके काय कार्य करतात हा आजच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संशोधनाचा विषय ठरेल. त्यातल्या त्यात त्यांचे राम माधव नावाचे प्रचारक व पूर्व भाजप मंत्री यांच्या एकूण कृतीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. भाजपने 2017 पासूनच्या पूर्वोत्तरकडच्या सगळ्या निवडणुका विविध कारस्थाने करून जिंकल्या. 2019 ची लोकसभा निवडणूक, तत्पूर्वीची विधानसभा व 2022 ची विधानसभा निवडणूक या जोडगोळीने ‘युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट’ या कुकी अतिरेकी संघटनेशी हातमिळवणी करून जिंकली. त्यासाठी त्यांना सुशांत पूर या मणिपूरमधील ठिकाणी जाऊन करोडो रुपये दिले गेले, ही बातमी त्यावेळी विविध वर्तमानपत्रांत आली होती.

त्यानंतर त्यांचे मैतेईंवर हल्ले सुरू झाले. त्यांनी खूनखराबा चालू केला. त्यामध्ये 300 हून अधिक लोकांची हत्या करण्यात आली; 1700 घरे उद्ध्वस्त केली गेली. 35000 लोक निर्वासित झाले. परिस्थिती बिघडत-बिघडत भाजपच्या नियंत्रणाच्या बाहेर जात चालली. त्याच वेळेस नेमकी एक बातमी फुटली; भाजपने या अतिरेकी संघटनेबरोबर काही करार करून; त्यांना काही आश्वासने दिल्याची. ते आश्वासन म्हणजे मैतेईंवर निर्बंध लादण्याचे. याच दरम्यान दुर्दैव असे की, या अतिरेकी संघटनेमध्ये दुफळी झाली. त्यांनी भाजपसाठी ज्या निवडणुका हायजॅक केल्या त्याची किंमत मागायला सुरुवात केली. त्यातच वर म्हटल्याप्रमाणे मैतेईंवर निर्बंध लादण्याची त्यांची मागणी होती. यातून मैतेई समाज अस्वस्थ झाला त्यांच्यात असंतोष वाढत गेला आणि तो रस्त्यावर उतरायला लागला.

यादरम्यान काही असामाजिक तत्त्वांकडून दिल्ली येथून व्हिडीओ व्हायरल केला गेला. एका प्लॅस्टिकच्या वेष्टणात एका मृत महिलेला दाखवण्यात आले आणि ती मैतेई असल्याची बतावणी केली गेली. या फेक व्हिडीओमुळे मणिपूरची तब्येत पूर्णतः बिघडली. आज जी घटना समोर येत आहे; ती म्हणजे दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने रस्तोरस्ती फिरवले. नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. ही त्या फेक व्हिडीओची प्रतिक्रिया. मैतेईंना चुचकारण्यासाठी त्यांचा समावेश ‘एसटी’मध्ये करण्याचा विषय सुरू झाला. यामुळे आदिवासी कुकी आणि नागा भडकले. या निर्णयामुळे मणिपूरमधील वातावरण अधिक गडद झाले व धुमसू लागले. मैतेई व कुकी आमने-सामने उभे ठाकले. किंबहुना स्थानिक शासनाचा हाच उद्देश असावा. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याची भयंकर घटना घडण्याची ही पार्श्वभूमी आहे. तेव्हापासून आतापर्यंत मणिपूर जळत आहे. मानवतेला काळिमा फासला जात आहे. तेथील माणसे माणूस न राहता हैवान बनली आहेत. त्या दोन महिला विवस्त्र केल्या गेल्या नाहीत तर; या देशातील पूर्वापार चालत आलेली मानवीयता, संवाद परंपरा, सहिष्णुता व सौहार्द आणि लोकशाही सर्वच विवस्त्र केले गेले. देशाला जगापुढे मान खाली घालावी लागली. 4 मेची ही दुर्दैवी घटना 19 जुलैला उघडकीस आली, कारण इंटरनेट सर्वत्र बंद होते. यावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मोठी गमतीशीर आहे. या घटनेवर खेद व्यक्त करणे व त्याबरोबर राजीनामा देण्याऐवजी ते म्हणतात, ‘अशा शेकडो घटना राज्यात घडल्या आहेत!’ किती हा निलाजरेपणा! अशा या मुख्यमंत्र्याला केंद्रीय वरिष्ठ धक्का का लावत नाहीत; यामागे काय गौडबंगाल आहे? अर्थात विद्यमान सत्ताधाऱ्यांपुढे नैतिक जबाबदारीच्या गोष्टी करणं अस्थानी ठरेल.

मणिपूरमध्ये ‘मैतेई निपुण’ ही संस्था आहे. ती नेहमी अतिरेकी भूमिका घेत आली. तिचे नेते प्रमोद सिंग नामक व्यक्ती आहेत. ही संघटना संघाच्या मार्गदर्शनाखाली व पाठिंब्यावर वाढलेली आहे. संघाच्या निर्देशानुसार ते काम करतात. या संघटनेचा प्रमुख प्रमोद सिंग याची मुलाखत दंगलीपूर्वी करण थापर यांनी घेतली होती. त्यात त्यांनी खूप भडकावू भाषा केली. त्यांना संघासारख्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती; परंतु दिल्ली स्थित कुकी विद्यार्थ्यांनी या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून त्यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल करण्याचा प्रयत्न केला. तो महिनाभरानंतर यशस्वी झाला. नंतर प्रमोद सिंग गायब झाले. या त्यांच्या संघटनेमुळे जे धार्मिक व जातीय ध्रुवीकरण राज्यात झाले त्याची परिणीती ही आजची परिस्थिती आहे. आज तिथे कुकी आणि मैतेई ‘घेटो’ पद्धतीने राहू लागले आहेत. त्यांच्यामध्ये ‘बफर झोन’ तयार झाले आहेत. जे देशपातळीवर संघ प्रणित संघटनांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये घडवून आणले आहे. या देशातली शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ‘गंगा जमुना संस्कृती’ला या विचारधारेने तिलांजली दिली आणि देशाला अराजकाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे.

या विषयाला इतरही काही पदर आहेत. पंतप्रधान मोदी यांचे या मणिपूरच्या डोंगरी भागावर लक्ष केंद्रित आहे, ते त्यांच्या मित्रांसाठी. पूर्वोत्तरचे ज्येष्ठ पत्रकार, सौमित्र राय म्हणतात की, ‘जीएसआय’ सर्वेक्षणानुसार मणिपूरच्या जंगलांमध्ये मौल्यवान खनिजे आहेत. त्यामध्ये निकेल, तांबे आणि प्लॅटिनम इत्यादी खनिज साठा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा लिलाव झाला आहे. तिथे कुकीचे अस्तित्व असेपर्यंत खोदकाम होऊ शकत नाही. म्हणून हा नरसंहार अपरिहार्य बनला आहे का? ’

पोलीस व प्रशासन कर्मचारी यांच्यातही विभाजन झालेले आहे. ते इतके की, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या दंगलीमध्ये कुकी डीजीपी बदलला आणि मैतेई यांना मोकळे रान दिले. भाजपच्याच कुकी आमदारांनी मुख्यमंत्री पक्षपात करत आहेत, असा आरोप एन. बिरेन सिंह यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केला. स्थानिक म्हणतात, जमीन खोदली तरी हत्यारे मिळतील. या भागात अनेक अतिरेकी संघटना आहेत; पण यापूर्वी कोणीही स्त्रिया व मुले यांच्यावर हल्ला कधीच केला गेला नाही. मणिपूरमध्ये आता नवीनच आक्रित घडत आहे.