वेब न्यूज – 2024 अनोखे अंतराळ वर्ष

>> स्पायडरमॅन

2024 या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या अंतराळ संस्था ‘इस्रो’ने आपल्या XPoSat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला. XPoSat च्या माध्यमातून ‘इस्रो’ कृष्णविवर अर्थात ब्लॅकहोल आणि सुपरनोव्हांचा अभ्यास करणार आहे. जगातील आघाडीच्या सर्व देशांचे लक्ष हिंदुस्थानच्या या खास मोहिमेकडे लागलेले आहे. अशा कृष्णविवर आणि सुपरनोव्हाच्या अभ्यासासाठी उपग्रह पाठवणारा हिंदुस्थान हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा देश ठरला आहे.

‘इस्रो’च्या यशस्वी चांद्रयान मोहीम आणि XPoSat च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता खगोलप्रेमी आणि खगोलतज्ञांना वेध लागले आहेत ते अमेरिकेच्या नासाच्या पार्कर सोलर प्रोब या अंतराळ मोहिमेचे. पार्क सोलर प्रोब या उपग्रहाद्वारे अमेरिका सूर्याच्या आजवरच्या सर्वात जवळच्या अंतरापर्यंत पोहोचणार आहे. सूर्याच्या इतक्या जवळ आजवर कोणतेही यान गेलेले नाही. हे एक प्रकारे सूर्यावर यान उतरल्या सारखेच असणार आहे, असे खगोलतज्ञ सांगतात. विशेष म्हणजे या वेळी यानाचा वेग प्रतिसेपंद 195 किलोमीटर असा थक्क करणारा असणार आहे.

24 डिसेंबर 2024 रोजी पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचेल. आजवर कोणतीही मानवनिर्मित वस्तू सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचलेली नाही. त्यावेळी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पार्कर सोलर प्रोबला प्रतिसेपंद 195 असा थरारक वेग प्राप्त होईल. या वेगाने न्यूयॉर्कहून लंडनला अवघ्या 30 सेपंदात पोहोचता येईल. या मोहिमेत सहभागी असलेल्या संशोधकांच्या मते ही मोहीम यशस्वी झाल्यास तिची तुलना 1969 साली चंद्रावर मानव उतरल्याच्या मोहिमेशी करता येईल. कारण पार्कर सोलर प्रोब मोहीमदेखील जगासाठी तेवढीच महत्त्वाची आणि भविष्यकाल उज्ज्वल बनवणारी असणार आहे.

नासाने 2018 साली ही मोहीम सुरू केली होती. सूर्याच्या आवरणात घुसणे आणि तिथले तापमान मोजून त्वरित माघारी परतणे हे सोलर पार्कर प्रोबचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ते सूर्याच्या जवळ पोहोचेल तेव्हा सूर्याचे तापमान 1400अंश सेल्सियसच्या आसपास असेल.