आभाळमाया – थोडं ‘जेम्स वेब’विषयी…

>> वैश्विक,  [email protected]

आपण  स्वीकारलेलं काम चांगलं असावं आणि ते मनापासून करावं वगैरे बोधप्रद वाक्यं आपण शालेय जीवनापासून ऐकतो. हाती घेतलेल्या कामांना माणसं किती न्याय देतात ते नक्की सांगता यायचं नाही, परंतु अवकाशात पाठवलेल्या दुर्बिणीसारखी यंत्रे खऱ्या अर्थाने विश्वव्यापी आणि पृथ्वीच्या कल्याणाचं काम करत आहेत. 1957 पासून सुरू झालेल्या माणसाच्या अवकाश अभ्यासाने आता मोठी झेप घेतली आहे. आपलं ‘चांद्रयान-3’ चंद्रावर उतरलं. ‘आदित्य’ ‘एल-1’कडे योग्य मार्गक्रमणा करत आहे आणि ‘गगनयाना’ची ‘टेस्ट फ्लाइट’ ठरल्या वेळेनुसार गेल्या 21 तारखेला यशस्वी झाली असेल अशी अपेक्षा करू या. आपलं ‘आदित्य’ हे सौरयान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये, परंतु चंद्रापलीकडे असलेल्या ‘लॅगरॅन्ज-1’ बिंदूवर स्थिरावणार असल्याने ते निर्वेधपणे सूर्याचं सूक्ष्म निरीक्षण करू शकेल. त्यात कोणताही अवकाशी अडथळा येणार नाही. या सर्व यानांच्या सध्याच्या प्रगतीविषयी पुढच्या लेखात जाणून घेऊ.

या लेखात जेम्स वेब या 21 फूट व्यासाच्या आणि एका वेळी 26 चौरस मीटर अवकाशाचं सूक्ष्म निरीक्षण करू शकणाऱ्या अवकाश दुर्बिणीच्या यशाबद्दल. अमेरिकेने चंद्रावर जाणारी ‘अपोलो’ मोहीम सुरू केली. त्या वेळी मोलाचे कार्य करणारे जेम्स ई. वेब यांचे नाव या आरशाच्या अवकाश दुर्बिणीला दिले असून एका अवकाश संशोधन संस्थेच्या व्यवस्थापनाचा सन्मान ‘नासा’ने केला आहे.

आता या दुर्बिणीच्या महत्त्वाच्या वैशिष्टय़ांविषयी आणि आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाविषयी थोडंसं. अवकाशात ‘हबल’ दुर्बिणीसारखी काही वस्तू पाठवणं आणि थेट अवकाशातूनच अवकाशाचं निरीक्षण करणं ही 1990 मधली आश्चर्यकारक गोष्ट होती. आजही ती हबल दुर्बीण कार्यरत असून 2030 ते 40 एवढा तिचा कार्यकाळ असण्याचा अंदाज आहे. पृथ्वीपासून सुमारे 540 किलोमीटरवरून फिरणारी ही दुर्बीण रात्रीच्या वेळी (योग्य तारखेला) ठिपक्यासारखी दिसू शकते. त्यानंतर चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या नावे ‘चंद्रा’ स्पेस टेलिस्कोप अवकाशात गेला. या इमानेइतबारे काम करणाऱ्या दुर्बिणीचा आढावाही एखाद्या लेखात घेऊ या. कारण आतापर्यंत त्यांनी पाठवलेल्या लक्षावधी अवकाश प्रतिमा आणि अन्य ‘डेटा’ एवढा प्रचंड आहे की, त्यातल्या केवळ महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या तरी एक पुस्तक होईल.

जेम्स वेब ही अवकाश दुर्बीण नासा, युरोपियन स्पेस एजन्सी अशा अवकाश संस्थांनी बनवली आणि फ्रेंच गियाना येथील अवकाश वाहनतळावरून 25 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री 12 वाजता  अवकाशात झेपावली. त्यातून सात-आठ तास वजा केले तर ती आपल्याकडची वेळ येईल. या टेलिस्कोपने ‘लॅगरॅन्ज पॉइंट’ क्रमांक- 2 वर स्थिर होण्यासाठी उड्डाण केलं होतं. सूर्य-पृथ्वी यांच्यातील अतिशय कमी म्हणजे अगदी नगण्य गुरुत्वाकर्षणाच्या ज्या पाच जागा आहेत, त्यातील ‘एल-2’ हा बिंदू पृथ्वीच्या पलीकडे 15 लाख किलोमीटरवर आहे. ‘एल-1’ सूर्य-पृथ्वीच्या मध्ये असल्याने तो सौर निरीक्षण सातत्याने करण्यासाठी योग्य, परंतु बाहय़ अवकाशाचं (आऊटर स्पेस) निरीक्षण करण्यासाठी तो सूर्यापासून लांब आणि पृथ्वीच्या पलीकडे असणारा बिंदू हवा. ‘एल-2’ यान पाठवायला तुलनेने जवळ आणि सूर्याच्या उष्णतेपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी योग्य असलेली तसंच विनाअडथळा बाहय़ विश्वाचं निरीक्षण करू शकणारी योग्य जागा आहे. ‘जेम्स वेब’ दुर्बीण तिथे 12 जुलै 2022 रोजी स्थिरावली.

तेव्हापासून या दुर्बिणीने विलक्षण फोटो पाठवले आहेत. या दुर्बिणीच्या इफ्रारेड कॅमेऱ्याने अवकाश धुळीमुळे (कॉस्मिक डस्ट) धूसर वाटणाऱ्या क्षेत्रापलीकडचंही अवकाश चित्रित केलं आहे. हबल या सात फुटी व्यासाच्या आणि पृथ्वी परिक्रमा करणाऱ्या जवळच्या दुर्बिणीने जे शक्य नव्हतं ते ‘जेम्स वेब’ करत आहे. अर्थात त्यामुळे हबलचं यश कमी होत नाही. 2 लाख 50 हजार ते 83 लाख 20 हजार किलोमीटरच्या लंब वर्तुळात फिरत असलेल्या ‘जेम्स वेब’ दुर्बिणीचा आरसा षटकोनी आरशांचा मिळून बनला आहे. तो पूर्णपणे गोल्ड कोटेड (सोन्याचा मुलामा दिलेला) असून दूरस्थ वैश्विक वस्तूंचा वेध घेत आहे. सुमारे साडेपाच वर्षांत त्याला दिलेलं प्राथमिक काम पूर्ण होणार असलं तरी तो 10 ते 20 वर्षे कार्यरत राहील अशी संशोधकांची अपेक्षा आहे. दुर्बिणीच्या ‘बेरिलियम प्रायमरी मिरर’ने अनेक अवकाश वस्तूंची छायाचित्रं प्रथमच पाठवली असून त्यांचे रंग सुस्पष्ट आहेत.

या दुर्बिणीचा इफ्रारेड स्पेक्ट्रम (वर्णपट) -223 अंशापर्यंत थंड ठेवावा लागतो. त्यासाठी उत्कृष्ट सनशील्ड असून या सौर कवचामुळे तो सुरक्षित आहे. विश्वनिर्मितीच्या आरंभीच्या काळातील म्हणजे बिग बॅन्गनंतर लवकरच तयार झालेल्या ‘डीप स्काय ऑबजेक्टस्’च्या प्रतिमा संशोधकांना चकित करत आहेत. काही (चार) दीर्घिकांचं वय तर सध्याच्या बिग बॅन्गपासूनच्या 13.7 अब्ज वर्षे वयापेक्षाही जास्त असल्याचं मत काही संशोधक व्यक्त करतायत. याचाच अर्थ विश्व वयाचा ऍकेडेमिक ‘घोळ’ अजूनही सुरूच आहे. एकदा बिग बॅन्गनंतर विश्वनिर्मिती झाली हे मान्य केलं की, ‘आधीचा’ विचार संभवतच नाही असं म्हटलं जातं. मग या ‘आधी’च्या दीर्घिका आल्या कुठून हे एक कोडंच आहे. कदाचित विश्वाचं वय वाढू शकतं. पुढे कदाचित ‘शाश्वत’ असल्याचंही म्हटलं जाईल का? ठाऊक नाही. त्यासाठी पुराव्यानिशी सांगावं लागेल. जेम्स वेब दुर्बीण निर्लेपपणाने ‘डेटा’ गोळा करतेय, निष्कर्ष संशोधकांनी मांडायचे आहेत.