प्राणिमित्राचा सन्मान

लहान वयापासून घेतोय प्राणी, पक्ष्यांची काळजी लहान वयापासूनच भांडुपचा हितेश यादव प्राणी आणि पक्ष्यांची काळजी घेत आहे. आतापर्यंत त्याने अनेक पक्षी व प्राण्यांची सुखरूप सुटका केली आहे. तसेच जखमी पक्ष्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्याच्या कार्याची दखल ऑनिलम वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने घेऊन त्याला नुकतेच विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे.

4 ऑक्टोबर हा जागतिक प्राणीदिन म्हण्नू साजरा केला जातो. यानिमित्ताने ऑनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने नुकतेच विविध पुरस्कारांचे वितरण केले. यामध्ये जीवदया- बाल श्रेणी पुरस्कार 17 वर्षांच्या हितेश यादव याला मिळाला. हितेशला प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी दिलेल्या योगदानासाठी गौरवण्यात आले. नवी दिल्ली येथे गुरुवारी हा कार्यक्रम झाला. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेयरी मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बालियान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हितेश यादव हा मुंबईतील अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लाण्ट ऍण्ड ऑनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज – मुंबई) या प्राणिमित्र संस्थेचा स्वयंसेवक आहे. हितेशने संकटात सापडलेल्या चिमणी, कावळा, कबुतर, घुबड, कोकीळ, साप, कासव अशा अनेक पक्ष्यांची सुटका केली आहे. जखमी प्राणी व पक्ष्यांची देखभाल करणे, संकटात सापडलेल्या प्राणी व पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे अशा कामात तो हिरिरीने भाग घेतो. हितेश स्वतःहून मुंबईतील विविध भागांतील नागरी वसाहतींना भेट देत वन्यप्राण्यांच्या अधिवासविषयी जागरूक करण्याचेही काम करतो. याशिवाय सोशल मीडियावरही तो वन्यजीव गुह्यांबाबत जनजागृतीपर माहिती देत असतो.

जगातील तरुण स्पॅरो सेव्हर

पक्षी आणि प्राणी संवर्धनासाठी केलेल्या भरीव योगदानाबद्दल हितेशला याआधीही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 2012 साली जगातील सर्वात तरुण स्पॅरो सेव्हर म्हणून एव्हरेस्ट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हितेश याची नोंद करण्यात आली आहे. आपल्याला प्राणिमित्र म्हणून घडवण्याचे श्रेय तो एसीएफ पॉज – मुंबईचे संस्थापक सुनिष सुब्रमण्यन आणि निशा कुंजू यांना देतो.