मुलांसाठी आरोग्याची पुंजी

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

सध्याचे युग हे स्पर्धेचे आहेयाचा परिणाम मुलांच्या पुढच्या आयुष्यावर होणार आहे. ज्याप्रमाणे आपण मुलांचा अभ्यास आणि त्याच्या भविष्याची सोय करून ठेवायला धडपडत असतो तसेच त्याच्यासाठी आरोग्याची पुंजी साठवणे पण गरजेचे आहे. कारण तरच त्यांना पुढे तुमच्या इतर साठवणुकीचा  आनंद घेता येईल.

आज आपण बघतोय की मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर विकार बळावत चाललेले  आहेत. आताच जर ही परिस्थिती असेल तर पुढे काय होईल याचा विचारच करायला भीती वाटते. कारण आपली मुले ज्या वातावरणात वाढत आहेत त्यात फास्ट फूड, कॉम्प्युटर, बैठे खेळ आणि ताणतणाव खूप जास्त आहे.

मुलांना उत्तम आरोग्याच्या सवयी लावण्यासाठी-

  1. शक्यतो फास्ट फूडच्या हॉटेल्समध्ये जाणे, पार्टी ठेवणे टाळा. तसेच त्याबद्दल बोलणे किंवा घरी मागवणे टाळा किंवा महिन्यात एकदाच हे मिळेल असे धोरण ठेवा.
  2. व्यायामाची अथवा खेळाची आवड लावा. त्यासाठी स्वतः त्याची आवड निर्माण करा. आठवडय़ातून एकदा रविवारी मुलांबरोबर सहल काढा, जिथे सर्व कुटुंबीय खेळण्याची आणि पोहण्याची, टेकडी चढणे अशी मजा घेतील आणि त्यातील आनंद मुलांना जाणवू द्या. 3.मुलांना भाजी घेणे, फळे घेणे या खरेदीत सहभागी करा. त्यांची नावे आणि महत्त्व शेअर करा. म्हणजे त्यांना त्यात कुतूहल वाटू लागेल.
  3. त्याचप्रमाणे काय खायला करावे या चर्चेत तसेच त्यांची छोटी छोटी मदत घेतली तरी त्यांना पदार्थात रस वाटू लागेल.
  4. शक्यतो एकत्र जेवा आणि जेवताना वातावरण खेळीमेळीचे ठेवा. (टीव्ही टाळा.)
  5. मुलांना पदार्थावरील लेबल वाचायला लावा आणि चांगले आणि वाईट यातील फरक समजावून सांगा.
  6. खाण्यापूर्वी हात धुणे, खाल्ल्यावर चूळ भरणे  आणि पदार्थ चावून चावून खाणे या सवयी त्यांना नक्की असू द्या.
  7. बक्षीस म्हणून पॅडबरी, केकसारखे गोड पदार्थ द्यायचे टाळा.
  8. काही साध्या पदार्थांना काही छान नावं दिली की, मुलांना त्यात मजा वाटते. तसेच पदार्थांचे वेगवेगळे आकार केले तरी मुलांना मजा वाटते.
  9. कृत्रिम रंग, अजिनोमोटो यांसारखे पदार्थ मुलांत चिडचिड आणि जास्त ऊर्जा निर्माण करतात आणि त्यांचा दंगा वाढतो. हे पदार्थ टाळा आणि शक्यतो नैसर्गिक पदार्थ द्या. कृत्रिम साखरेपेक्षा नैसर्गिक गूळ उत्तम !

आपल्या मुलांची वाढ नीट होत आहे ना, यासाठी त्यांची उंची, वजन यांची नोंद ठेवा आणि वय आणि वजनाप्रमाणे ते खात आहेत ना, त्यांना सर्व पोषक तत्त्वे मिळत आहेत का? हे आहार तज्ञांबरोबर चर्चा करून खात्री करून घ्या आणि गरज असेल तरच त्यांच्या सल्ल्याप्रमाणे सप्लीमेंटस् घ्या. मुले घरातील लोकांपेक्षा बाहेरील तज्ञ व्यक्तीचे जास्त ऐकतात असा माझा अनेक  मुलांबरोबर अनुभव आहे. यात त्यांना आपल्याला विशेष काहीतरी मान मिळत आहे आणि महत्त्व मिळत आहे याचाही आनंद होतो आणि ते नक्की ऐकतात.