विज्ञान-रंजन – हॉकिंगची जिद्द!

>> विनायक

विश्वविख्यात  खगोलशास्त्रज्ञ स्टीफन (किंवा उच्चार स्टीव्हन) हॉकिंग आज असते तर 82 वर्षांचे झाले असते. कारण 8 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. 1942 मध्ये जन्मलेले हॉकिंग यांना 2018 पर्यंत 76 वर्षांचं दीर्घायुष्य कसं लाभलं हा जगाच्याच नव्हे तर डॉक्टरांच्याही कुतूहलाचा विषय असावा. कारण 1963 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ‘मोटर न्यूरोन’ नावाच्या स्नायू उत्तरोत्तर अशक्त होत जाण्याच्या आजाराने त्यांना ऐन तारुण्यात ग्रासले. पुढे काय? असा प्रश्न मात्र त्यांना पडला नसावा. कारण व्याधीवर मात करत करत जगण्याची आणि तेसुद्धा अर्थपूर्ण (मिनिंगफुल) जगण्याची खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. त्यांना सळसळत्या तारुण्याच्या काळात पाहणारे प्रसिद्ध संशोधक डॉ. शशीकुमार चित्रे गप्पागोष्टींत त्यांच्या आठवणी सांगत असत. ज्या माणसाला केंब्रिजमधल्या इमारतीच्या जिन्यांवरून वेगाने उतरताना किंवा टेनिस खेळताना पाहिले, त्यांना त्याच विद्यापीठात व्हीलचेअरवरून शक्तिहीन शारीरिक अवस्थेत येताना पाहणं वेदनादायी होतं, असं डॉ. चित्रे म्हणत असत. अशीच प्रतिक्रिया त्यांच्या सर्वच सुहृदांची होती. परंतु स्टीफन यांनी विलक्षण मानसिक क्षमता दाखवून अवघ्या जगाला चकित केलं.

शरीराचा एकेक अवयव निक्रिय होत, हालचाल हळूहळू मंदावत ते परावलंबी झाले तरी त्यांचा तल्लख मेंदू संपूर्ण विश्वाचा विचार करत होता. ‘ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ या त्यांच्या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. ‘हॉकिंग रेडिएशन’, ‘गिबन-हॉकिंग इफेक्ट’ अशा एकामागोमाग एक संशोधनाची मालिकाच त्यांच्या मेंदूतून बाहेर पडू लागली. भौतिकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनाही हॉकिंग यांच्या प्रतिभेने प्रभावित केलं.

ऑक्सफर्ड येथे जन्म आणि शिक्षण झालेल्या हॉकिंग यांची अध्यापन, संशोधनाची कारकीर्द मात्र केंब्रिज विद्यापीठाशी निगडित होती. तिथल्या ट्रिनिटी कॉलेजात ते प्राध्यापक झाले. 1962 मध्ये केंब्रिजमध्ये आलेल्या आणि रमलेल्या हॉकिंग यांना 1963 पासूनच ‘मोटर न्यूरॉन’ या दुर्धर व्याधीने ग्रासलं, परंतु त्यांचं मन मात्र या शारीरिक व्याधींमुळे खचलं नाही, उलट व्हीलचेअरवर बसून विचार करत त्यांनी विश्वविचार मांडायला आरंभ केला. अखेरीस बोलणंही थांबलं. एखाद्या वक्ता-प्राध्यापकाचं बोलणं अचानक थांबणं किती क्लेशदायी असेल याची कल्पनाच असह्य वाटते. परंतु स्टीफन हॉकिंग यांना या भयंकर व्याधीसह जगावं लागलं. इंग्लंडसारख्या प्रगत मानलेल्या देशासही या व्याधीवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यांचं जीवनमान औषधांनी, उपचारांनी वाढवले हे मोठंच यश होतं. परंतु त्यांच्या ढासळत्या शारीरिक अवस्थेला काही निश्चित उपाय नव्हता. स्टीफन यांचा मन-मेंदू मात्र कधीच ढासळला नाही. कोणाही माणसाला जीवनाची आत्यंतिक प्रेरणा देणारी जिद्द हॉकिंग यांच्या ठायी होती.

संशोधनातले त्यांचे सहकारी होते नोबेल पुरस्कारप्राप्त झालेले रॉजर पेनरोज. या दोन्ही जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना मुंबईत पाहण्याचे, त्यांचे विज्ञानविचार ऐकण्याचे भाग्य मलाही अनेकांप्रमाणे लाभले. अर्थात स्टीफन यांचे भाषण 2001 च्या 14 जानेवारीला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झाले ते ‘स्पीच जनरेटिंग डिव्हाइस’च्या माध्यमातून. व्हीलचेअरवर बसलेले स्टीफन कलत्या मानेने, कोणतीही हालचाल स्वतःला करता येत नसताना मंचावर आणले गेले तेव्हा डोळे नकळत पाणावले. कारण त्यांच्या खगोलीय संशोधनाचा परिचय त्यांच्या पुस्तकांमधून आधीच झाला होता.

तळव्यावरच्या ‘पाम टॉप’ कॉम्प्युटरसारख्या ‘डिव्हाइस’द्वारा (यंत्र) त्यांनी उसन्या स्वरात उत्तम खगोलीय विवेचन केले. आठवते त्यानुसार महिंद्रा कंपनीने त्यांच्या व्हीलचेअर प्रवासासाठी खास कार बनवली होती. आमच्या ‘खगोल मंडळा’च्या एका सभासदाने स्टीफन यांची ‘टीआयएफआर’मध्ये दुर्मीळ भेटही घेतली होती. 2001 पूर्वीही 1959 मध्ये स्टीफन मुंबईत आले होते. त्यावेळी ते अतिशय उत्साही तरुण होते. हँगिंग गार्डन, नरीमन पॉइंट येथे त्यांनी भ्रमंतीही केली. टीआयएफआर परिसरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एक चैतन्यमय तरुण असं त्यांचं त्यावेळचं रूप होतं. 2001 मधली गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. परंतु तोपर्यंत त्यांची बौद्धिक प्रगल्भता कळसाध्यायापर्यंत पोहोचली होती. आम्ही एका विश्वविख्यात आणि विलक्षण शास्त्रज्ञाच्या दर्शनाने भारावलो होतो.

आज स्टीफन हॉकिंग यांच्या जन्मदिनावरून हे सारं आठवलं. त्यांची जिद्द अक्षरशः गगनाला गवसणी घालणारी होती. ‘शून्य गुरुत्वाकर्षणाची अनुभूती’ घेण्याची त्यांची इच्छा रिचर्ड ब्रॅसन यांच्यामुळे एका खास बोइंग विमानातून प्रवास घडवून पूर्ण करण्यात आली. त्यांचे अनेक व्हिडीओ, त्यांच्या जीवनावरचा चित्रपट, प्रसिद्ध विज्ञानलेखक आर्थर सी. क्लार्क यांनी घेतलेली त्यांची मुलाखात हे सारं आता यूटय़ूबवर असेल.

असाध्य आजारामुळे जर्जर झालेल्या शरीराचं दहन त्यांच्या मृत्यूनंतर करण्यात आलं आणि नंतर त्यांची रक्षा वेस्टमिनिस्टर ऍबी येथे न्यूटन आणि डार्बिन या शास्त्रज्ञांच्या कबरींच्या मधल्या जागेत पृथ्वीला समर्पित करण्यात आली. स्टीफन हॉकिंग त्यांच्या संशोधनातून तर अमर ठरलेच, पण त्यांची जीवनेच्छा आणि प्रगल्भता पुढच्या पिढय़ांना सतत प्रेरणा देत राहील.