साहित्य जगत – वेधक आठवणी

>>रविप्रकाश कुलकर्णी

प्रत्येकाच्या आयुष्यात सांगण्यासारखे काहीतरी असतेच. प्रदीर्घ आणि संपन्न आयुष्य लाभलेल्या प्राध्यापक श्री. द. महाजन (जन्म 11 नोव्हेंबर 1932) उपाख्य बापू यांनी आपल्या आयुष्यातील कडूगोड आठवणींना उजाळा दिला, त्या ग्रंथबद्ध केल्या, ते पुस्तक म्हणजेच ‘जंगली मी बापू’. अर्थात याचा उलगडा व्हावा म्हणून त्याचा खुलासा त्यांनी केला आहे…‘आठवणींचा आलेख.’

श्री.द. महाजन म्हणजे जे काही मोजकेच आणि सर्वश्रेष्ठ असे प्लान्ट टॅक्साना मिस्ट (वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ) आहेत. त्यांच्याबद्दल सार्थपणे म्हटले जाते की, कोणत्याही ठिकाणची, कुठल्याही जंगलातील, कोणतीही वनस्पती पाहिल्याबरोबर ते ओळखू शकतात. त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे काही पाने असलेली नुसती एक डहाळी आणून दाखवली की, त्या झाडाचे मराठी नाव, वनस्पतीशास्त्राrय नाव आणि सविस्तर माहिती, त्याचे उपयोग इत्यादी गोष्टी ते कळेल असे सांगू शकतात. लेखणी आणि वाणी या दोन्ही गोष्टी त्यांना वश आहेत. अनेकदा त्यांचे वर्णन ‘वनस्पतीशास्त्राचा चालता बोलता विश्वकोश’असे केले जाते .

विशेष म्हणजे हे विद्याधन महाजन महाविद्यालयीन पातळीपासून ते सर्वसामान्य जिज्ञासूपर्यंत मुक्तपणे ते मोठय़ा उत्साहाने देत असतात. या ज्ञानगंगेत त्यांना जे अनुभव आले, जी माणसे भेटली त्यात आनंद कर्वे यांच्यापासून अनिल अवचटांपर्यंत आणि चित्रपट निर्माते शक्ती सामंतांपासून ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वन अभ्यासक सेसिल सलढाणापर्यंत यांच्या चित्तवेधी आठवणी बापू यांनी मनपूर्वक सांगितल्या आहेत. ते स्वतला ‘जंगली मी बापू’ म्हणतात. आंतरराष्ट्रीय जंगल परिषदेत परस्पर परिचय करून देताना एकाने केवळ 20 सेकंदांत स्वपरिचय आटोपला तो असा…‘सेसिल सलढाणा, बंगलोर…आय एम जंगल मॅन.”
याचा परिणाम म्हणून त्यांच्या शेजारच्याने स्वतची ओळख करून दिली…“श्रीधर महाजन, कोल्हापूर, महाराष्ट्र… आय एम अल्सो ए जंगल मॅन.”

बापूंच्या ‘पूर्वायण’मध्ये पुणे प्रशस्ती येते. शाळा नूतन मराठी विद्यालय. याबद्दल सांगताना शिक्षक दत्तो वामन पोतदार, वि.वि. बोकील, ना.ग. नारळकर यांच्या आठवणी ते जागवतात. तसेच हायस्कूलला ‘प्रशाला’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केलेला शब्द सर्वप्रथम वापरात आणणारी आमची शाळा असावी, असेही ते सांगतात. पुढे ते असेही म्हणतात की, “नूमविविषयी कितीही लिहिले तरी खूप काही राहिलंय, ही मनोभावना कायम राहते. आम्ही काही नूमविय एकत्र जमल्यावर शाळेचा विषय निघतोच आणि मग आमच्यात काय सांगू आणि किती सांगू, अशी अहमहमिकाच सुरू होते!”

या पुस्तकातील अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बापूंनी आपल्या तोतरेपणावर केलेली मात. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे बापूंना जो धक्का बसला, त्याने त्यांच्या वाचेवर परिणाम होऊन त्यांना तोतरेपण आले. त्या न्यूनगंडामुळे त्यांच्या साऱया आयुष्यावर विपरीत परिणाम झाला. ते म्हणतात, “माझे खच्चीकरण करणाऱया या दोषापासून पूर्णपणे सुटका होण्यासाठी 14 वर्षे लागली. पांडवांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास अशी सजा झाली होती. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षे वनवासाची शिक्षा भोगायला लागली होती. माझी शिक्षा होती दहा वर्षे अज्ञातवास आणि चार वर्षे वनवास!” या व्याधीवर त्यांनी प्रयत्नपूर्वक आणि चिकाटीने वेगवेगळे प्रयत्न करून त्यावर केवळ मात केली नाही तर पुढे ते उत्कृष्ट व्याख्याते आणि वत्ते झाले.

पुण्यामध्ये बस्तान बसलेले असताना बापू पुढील भवितव्यासाठी कोल्हापूरला गोखले कॉलेजात रुजू झाले. कॉलेजच्या प्राध्यापकांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या आंदोलनासारखा अपवाद वगळता बापूंचे कोल्हापूर वास्तव सुखाचेच ठरले. पुणे आणि कोल्हापूरमधील अनुभवासंबंधात त्यांना ‘टेल ऑफ टू सिटीज’ असे पुस्तक लिहायचे आहे.

या पुस्तकात एक प्रकरण असे आहे की, त्याने धक्का तर बसतोच आणि मनही सुन्न होऊन जाते. बापू लिहितात, ‘रहस्यकथा, भयकथा, चित्रपट कथा लिहिणाऱया लेखकांनासुद्धा सुचणार नाही इतक्या भयंकर गोष्टी अत्यंत थंड डोक्याने आणि क्रूरपणे या दोघींनी सहजपणे केल्या.’

बापूंचा मुलगा दीपक आणि त्याची अखेर विलक्षण संयमाने त्यांनी लिहिली आहे, ती वाचून थरकाप व्हावा. अशा चित्रविचित्र हकीकतीसाठी बापूंच्या आठवणींचा आलेख डोळ्यांखालून घालायलाच हवा.