तिहारमध्ये केजरीवालांना अमानूष वागणूक; पत्नीला प्रत्यक्ष का भेटू दिलं नाही? नेमकं काय घडलं

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. मात्र तिहार तुरुंगामध्ये केजरीवाल यांना अमानूष वागणूक मिळत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत Sanjay Singh यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

सुनीता केजरीवाल यांची तिहार तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकलेली नाही. तुरुंग प्रशासनाने भेटीची परवागनगी तर दिली, मात्र खिडकीबाहेरूनच भेट घेण्याची अट घातली. भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली तुरुंग प्रशासन काम करत आहे, असा आरोप संजय सिंह यांनी केला.

तिहार तुरुंगामध्ये प्रत्यक्ष भेट होणे ही नित्याची बाब आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांना अमानूष वागणूक दिली जात आहे. तुरुंगातील कुख्यात कैद्यांनाही आपल्या कुटुंबियांना बॅरेकमध्ये प्रत्यक्ष भेटता येते. मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्या पत्नी आणि पीएशी खिडकीद्वारे भेट घडवली जात आहे. एवढी अमानूष वागणूक का? केजरीवाल यांना अपमानित करणे आणि त्यांचे खच्चीकरण करणे हाच यामागील उद्देश आहे, असा आरोपही संजय सिंह यांनी केला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपच्या एका खासदाराला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घ्यायची होती. मात्र अखेरची क्षणी ही भेट नाकारण्यात आली. यामागे सुरक्षा हे कारण देण्यात आले. त्यांनाही खिडकीद्वारे भेट घ्या अशी अट घालण्यात आली. हा तीन वेळा मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या केजरीवाल यांचा अपमान असून त्यांना मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदा धाब्यावर बसवण्याचा हा प्रकार आहे, असा संतापही संजय सिंह यांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अरविंद केजरीवाल यांना संविधान, लोकशाही, कायदा आणि तुरुंग नियमानुसार जे अधिकार मिळाले आहेत त्या अधिकारांना गदा आणू नका. हुकुमशहा बनण्याचा प्रयत्न करू नका, असेही संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ठणकावले.