लखनऊमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या अपहरणाचा प्रयत्न

भाजप शासित उत्तर प्रदेशात महिला मंत्र्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. कानपूर रस्त्यावर असलेल्या एका ढाब्याबाहेर केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची गाडी थांबली होती. यावेळी एक अज्ञात तरुण त्यांच्या गाडीत घुसला आणि गाडी चालू करून ती पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याची धुलाई करून अटक केली. हा प्रसंग घडला तेव्हा साध्वी निरंजन ज्योती गाडीत नव्हत्या. गाडीमध्ये गनर बसला असल्याने साध्वीही गाडीतच असतील हा विचार करत तरुणाने गाडी पळवण्याचा प्रय्न केला होता. हा तरुण घरातील भांडणांमुळे त्रस्त झाला होता आणि गाडीतील अधिकाऱ्यांशी बोलायचे असल्याने आपण गाडीत घुसलो होतो असा दावा या तरुणाने केला आहे. तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

मंगळवारी सकाळी साध्वींचा ताफा त्यांना घेण्यासाठी विमानतळाकडे जात होता. ताफ्यामध्ये पोलिसांच्या वाहनासह अन्य दोन गाड्याही होच्या. धुकं असल्याने ताफा धीम्या गतीने जात होता. विमानाला उशीर झाल्याने ताफ्यातील कर्मचारी, पोलीस हे ढाब्यावर चहा प्यायला थांबले होते. त्याचवेळी दीपक नावाचा आरोपी तिथे आला आणि मंत्री गाडीत असतील असं वाटल्याने तो गाडीत घुसला. मंत्र्यांचे अपहरण करणे हाच त्याचा उद्देश असल्याचा पोलिसांना संशय आहे. दीपक गाडीत शिरला तेव्हा गाडीची चावी तशीच होती, यामुळे त्याने गाडी सुरू केली आणि तो गाडी चालवायला लागला होता. गाडीतील इतरांनी त्याला विरोध करताच दीपकने त्यांच्याशी भांडायला सुरुवात केली, यामुळे पोलिसांनी त्याला खेचून गाडीबाहेर काढलं आणि त्याची धुलाई केली. दीपक हा आलमबागमध्ये राहात असून विभूतीखंडमध्ये एका खासगी कंपनीत तो कामाला होता. नोकरी गेल्याने तो तणावाखाली होता आणि त्याचा घरात वाद सुरू होता. घरातील भांडणांना कंटाळलेल्या दीपकला पोलीस अधिकाऱ्यांना भेटायचे होते. आपण अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गाडीत शिरल्याचे दीपकचे म्हणणे आहे. मात्र त्याने गाडी सुरू करून ती चालवण्याचा प्रयत्न का केला याचे तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.