खासगी संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डींग व्हायरल केले, आरोपींना पोक्सो कायद्याअंतर्गत अटक

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा ऑडिओ व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीमध्ये शिकत असणारी कोमल (बदलेले नाव) प्रियकराशी बोलण्यासाठी आरोपी मुकेशच्या फोनचा वापर करत असे. मुकेशने याच गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि कोमलच्या खासगी संभाषणाची रेकॉर्डिंग अन्य आरोपी विजेंद्रला पाठवली. त्यानंतर मुकेशने कोमलला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 16 वर्षीय कोमलला काय करावे हे समज नव्हते त्यामुळे तिने सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कोमलच्या वडिलांनी बौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरु केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी हरलाल मीणा यांच्या नेतृत्वाखाली पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.