साय-फाय – चंद्रवलय

>>प्रसाद ताम्हणकर

हिंदुस्थानच्या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर सर्व जग जणू चंद्राने झपाटले गेले आहे असे चित्र दिसत आहे. हिंदुस्थानच्या जोडीने रशियानेदेखील चांद्रमोहीम आखली होती, अर्थात रशियाला अपेक्षित असे यश काही मिळाले नव्हते. त्यानंतर कृषीच्या दृष्टीने चंद्राचा अभ्यास करणारी मोहीम चीन राबवत आहे. त्यासाठी त्याने काही बियाणी अंतराळात धाडलीदेखील आहेत. आता या सर्वांच्या जोडीला जपाननेदेखील चांद्रमोहिमेत उडी घेतलेली आहे. जपानच्या व या अंतराळ संस्थेने चंद्राशी संबंधित SLIM हे मिशन लाँच केले आहे. खेळण्यातल्या चेंडूप्रमाणे दिसणारा एक रोबोट ते चंद्रावर उतरवणार आहेत.

‘स्टार वॉर’ या चित्रपटातील रोबोटबरोबर अनेक जण या रोबोटची तुलना करीत आहेत. या चेंडूच्या आकाराच्या रोबोटला Lunar Excursion Vehicle 2 असे नाव देण्यात आले आहे. साधारण 2024 पर्यंत तो चंद्रावर पोहोचण्याची आशा आहे. या रोबोटचे वैशिष्टय़ म्हणजे याचे दोन स्वतंत्र भाग होऊ शकतात आणि ते दोन्ही भाग स्वतंत्रपणे फिरू शकतात. हा रोबोट चंद्रावर फिरणार आहे आणि तिथली छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवणार आहे. लहान मुलांच्या खेळण्यातून या रोबोटची कल्पना सुचली आहे. या रोबोटची बॅटरी अवघी दोन तास चालणार आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात पाठवल्या जाणाऱया रोव्हरसाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे.

लहान मुलांची खेळणी ज्याप्रमाणे टिकाऊ आणि अधिक सुरक्षित बनवली जातात, अगदी तसेच तंत्रज्ञान हा रोबोट बनवताना वापरण्यात आल्याची माहिती जपानच्या अंतराळ संस्थेने दिली आहे. हे तंत्रज्ञान वापरल्याने या रोबोट यानाला लागणाऱया अनेक घटकांना कमी करण्यात यश आले आणि त्यामुळे या रोबोटची विश्वासार्हता आणखी वाढली. या रोबोटला जपानी स्पेस एजन्सी, दोशिशा युनिव्हर्सिटी आणि खेळण्यांचे उत्पादन करणारी कंपनी ऊध्श्भ् यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. याशिवाय, सोनी कंपनीने रोबोटच्या गोल पायांमध्ये एक कंट्रोल बोर्ड आणि एक कॅमेरा बनवून दिला आहे. हा कॅमेरा चंद्रावर छायाचित्रे टिपेल आणि त्यांना पृथ्वीवर पाठवेल.

हिंदुस्थानची ‘चांद्रयान-2’, रशियाची ऑगस्ट महिन्यात फसलेली ‘लुना -25’ आणि त्यापूर्वी इस्रायलची फसलेली चांद्रमोहीम अशा प्रवासानंतर हिंदुस्थानच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेला मिळालेले यश पाहता आपलादेखील प्रयत्न यशस्वी होईल याची खात्री जपानच्या अंतराळ संस्थेतील शास्त्रज्ञांना वाटते आहे. सध्या तरी जगाचे लक्ष या मोहिमेकडे आहे हे नक्की. जपानच्या या चांद्रमोहिमेच्या जोडीलाच चंद्रावर दुर्बीण उभारण्याची संकल्पनादेखील जगातील काही शास्त्रज्ञांनी मांडल्याने चंद्र चांगलाच चर्चेत आला आहे. अर्थात चंद्रावर दुर्बीण उभारणे ही फार अवघड गोष्ट आहे हे नक्की.नासाची जेम्स वेब टेलिस्कोप ही आतापर्यंतची सर्वात प्रगत दुर्बीण आहे. तिच्या मदतीने अंतराळातील अनेक रहस्ये उलगडली गेली आहेत आणि भविष्यातदेखील उलगडली जाणार आहेत. अनेक देशांनी उंच पर्वतरांगांवर भल्यामोठय़ा दुर्बिणी बसवलेल्या आहेत तर काही देशांनी दुर्बिणींना अवकाशात सोडले आहे. अंतराळाची गुपिते उलगडण्याचे काम त्या पार पाडत असतात. मात्र इतक्यावरच समाधान न मानता आता थेट चंद्राच्या पृष्ठभागावर दुर्बीण उभारण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.

‘arXiv’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये ही कल्पना मांडण्यात आली आहे. या कल्पनेला हायपरटेलिस्कोप असे संबोधण्यात आले आहे. ही टेलिस्कोपची एक मालिका असणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर रेडिओ दुर्बीण बसवणे, त्याचबरोबर चंद्राच्या ध्रुवांवर सजीव सृष्टीचा वेध घेऊ शकणारी दुर्बीण (लाईफ फाइंडर टेलिस्कोप) बसवणे आणि या दुर्बिणींच्या मदतीने सौरमालेच्या बाहेरील ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करणे असे या योजनेचे स्वरूप असणार आहे. मात्र कागदावर अत्यंत सोपी वाटणारी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवणे अत्यंत अवघड असल्याचे मत काही खगोलतज्ञ मांडत आहेत. चंद्रावर उभारण्यासाठी ज्या दुर्बिणीची कल्पना मांडण्यात आली आहे, ती तांत्रिकदृष्टय़ा पृथ्वीवर तयार करणे हे सध्या तरी अशक्य असल्याचे त्यांचे मत आहे. आता ही कल्पना प्रत्यक्षात उतरणार का? हे लवकरच समोर येईल.
[email protected]