प्राणप्रतिष्ठेपूर्वी फोटो लीक झाले, अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होणार

22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शुक्रवारी हे फोटो सोशल मीडियावर दिसायला लागल्यानंतर ते वेगाने व्हायरल झाले. प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठेपूर्वीच फोटो लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय श्री राम मंदिर ट्रस्टने घेतला आहे. हा फोटो एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी केला असावा असा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना संशय आहे. अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदिराचे बांधकाम आणि डिझाइन लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या तांत्रिक सहाय्याने केले आहे. असा संशय आहे की एल अँड टी कंपनीतील कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने हा फोटो काढून व्हायरल केला असावा मात्र, हा फोटो व्हायरल कसा झाला . हे अद्याप कळू शकलेले नाही.

रामरायाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 10 अवतार कोरण्यात आले आहेत. उजव्या बाजूला मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, कमल, हनुमानाचे चित्र कोरण्यात आले आहे, तर डाव्या बाजूला परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की आणि गरुड यांची चित्रे कोरण्यात आली आहेत. मूर्तीचे एकूण वजन तब्बल 200 किलो इतके आहे. रामरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सुरू करण्यात आलेल्या विधींचा आज शुक्रवारी चौथा दिवस होता.

तात्पुरत्या मंदिरातील दर्शन बंद
तात्पुरत्या मंदिरातील रामरायाचे दर्शन आज शुक्रवारी सायंकाळपासून बंद करण्यात आले. 22 जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारीपासून भाविकांना नवीन मंदिरात दर्शन घेता येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी रामरायाची मूर्ती गर्भगृहात आसनावर ठेवण्यात आली. गाभाऱ्यात सुगंधी वातावरण रहावे यासाठी मूर्ती सुगंधित पाण्यात ठेवण्यात येणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी म्हटले आहे.

‘सिद्धिविनायक’ चे ज्येष्ठ पुजारी बाळकृष्ण सप्रे यांना पूजेचा मान
प्राणप्रतिष्ठा सोहळय़ासाठी देशभरातील निवडक पुजाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिराचे ज्येष्ठ पुजारी बाळकृष्ण सप्रे यांनादेखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पूजेचा मान मिळाला आहे. बाळकृष्ण सप्रे हे गेल्या 33 वर्षांपासून श्री सिद्धिविनायक मंदिरात पूजाअर्चा करतात. बाप्पाच्या आशीर्वादामुळेच अयोध्येत होणारा हा ऐतिहासिक सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याची संधी मला मिळाली आहे. याचा मला खूप आनंद होतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना निमंत्रण
– राम मंदिर जन्मभूमीप्रकरणी निकाल देणाऱ्या सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

– राम मंदिराचे संपूर्ण काम राजस्थानच्या मकराना शहरातील 59 वर्षीय मोहम्मद रमजान यांना देण्यात आले होते. सुमारे 25 वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेशी संबंधित लोक रमजान यांचे वडील सेठ बहुद्दीन यांच्याकडे आले होते. त्यांनी मकराना शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन राम मंदिरात वापरण्यात आलेले संगमरवर आणि त्यातील कारागिरी याबाबत सर्वेक्षण केले.

– अभिषेक सोहळय़ात कुठल्याही प्रकारचा घातपात होऊ नये यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची विशेष पथके अयोध्येत पोहोचली आहेत.

– विविध सुगंधी अत्तरे, लाडू, धनुष्य, श्रीरामांच्या प्रतिमेने सजवलेल्या बांगडय़ांपासून ते आग्य्राचा सुप्रसिद्ध 56 प्रकारचा ‘पेठा’ आणि 500 किलो लोखंडी-तांब्याचा ‘नगारा व ‘ओनाविल्लू’सारख्या पारंपरिक वस्तूंपासून तांदूळ, मिठाई या भेटवस्तूंचा ओघही वाढू लागला आहे.

– राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी देशभरातील रिलायन्सची कार्यालये बंद ठेवण्यात येतील.