भाजपाच्या आसुरी इच्छेमुळेच बीड जिल्ह्याचा लाखो ठेवीदार अडचणीत

>> उदय जोशी, बीड 

बीड जिल्ह्यातला एक उद्योजक अदानींना आव्हान देत आहे, प्रगतीच्या दिशेने झेपावत मोठी उंची गाठत आहे, गरज भासेल तेथें मदतीचा हात पुढे करत आहे, हा मासा आपल्या गळाला लागला पाहिजे या हट्टाला भाजपा पेटली, आवश्यकता नसताना ज्ञानराधा मल्टीस्टेटसह कुटे ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांवर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या, सगळी झाडाझडती घेतली. निष्पन्न काय झाले? हे बाहेर ही आले नाही, कुटेंना भाजपात घेण्याची भाजपाची असुरी इच्छा पूर्ण ही झाली, मात्र नेस्तनाबूत झाला तो लाखो ठेवीदार, आज सहा महिने होऊन गेले ठेवी परत मिळत नाहीत, प्रशासन कारवाई करत नाही, तक्रार देऊन ही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. ठेवीदार फक्त अन् फक्त पुढच्या तारखेकडे डोळे लाऊन बसले आहेत.

बीड जिल्ह्यात नव्हे तर अवघ्या राज्यभरात कुटे ग्रूपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटला ताळे लागले. सहा महिन्यापासून लाखो ठेवीदार ठेवी परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, पण दमडीही परत मिळेना, मल्टीस्टेटचे प्रमुख सुरेश कुटे आपल्या परिवारासह अज्ञात ठिकाणी आहेत, त्यांचा संपर्कही होईना, आपल्या ठेवी परत कधी मिळणार याकडे लाखो ठेवीदार डोळे लाऊन बसले आहेत, आयुष्यभराची कमाई मोठ्या विश्वासाने ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये टाकली अन् तीच कमाई अडकून पडली. अनेकांच्या मुलीचे विवाह थांबले, शेकडो पाल्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला, आरोग्य सुविधा मिळवण्यासाठीही खिशात दमडी राहिली नाही. हजारो वृद्ध दाम्पत्य पैसे नसल्यामुळे उपचार घेऊ शकेनात, बरं दाद मागायची तरी कोणाकडे? मल्टीस्टेटवर प्रशासनाचा अंकुश ना सहकार खात्याचा, जिल्हा प्रशासन ठोस कारवाई करेना, तक्रार दिली तर पोलीस प्रशासन प्रतिसाद देईना, ठेवी मिळणार की बुडणार या भीतीने ठेवीदार अस्वस्थ आहेत.

ज्ञानराधा अशी वेळ आणेल असे कोणालाच वाटले नव्हते, देशभरात कुटेच्या उद्योगाचे साम्राज्य, रोज नवीन उत्पादीत ब्रँड बाजारात धुमाकूळ घालतोय, दहा हजार वाहने, तीस हजार कर्मचारी असा सगळा झगमगाट, त्यात ज्ञानराधाचा आवाका तर बघायचे कामच नाही, असे सगळे असताना नेमके झाले काय तर उद्योगपती सुरेश कुटे यांना भाजपात घेण्याचा प्रयत्न चालू होता, त्यातच इन्कम टॅक्स खात्याने कुटेंच्या उद्योगावर छापे टाकले, सगळी बँक खाती सील केली, आठ दिवस अधिकारी त्यांच्या कंपन्यांवर तळ ठोकून होते, चौकशी पूर्ण झाली, पण अहवाल बाहेर आलाच नाही, कुटेंचा थेट भाजपात अत्यंत घाईत प्रवेशही झाला, इकडे मात्र ठेवी काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली अन् एवढी रक्कम उपलब्ध होवू शकली नसल्याने मल्टीस्टेटच्या शाखा बंद ठेवाव्या लागल्या, त्या आजपर्यंत बंद आहेत.

भाजपाच्या आसुरी इच्छेमुळे एक मोठा उद्योग संकटात सापडला, अनेक कंपन्यांचे उत्पादन सध्या ही बंद आहे, हजारो कर्मचारी पुन्हा बेकार झाले, अनेकांचे पगाराही मिळाल्या नाहीत, लाखो ठेवीदार उघडे पडले, दोन हजार कोटींच्या ठेवी अडचणीत आल्या, या सर्व घटनांना भाजपा जबाबदार असल्याचे बोलले जाते, भाजपने कुटेंना पक्षात घेतलेच पण एक चांगला उद्योग नेस्तनाबूत केला अन् २३ लाख ठेवीदार कंगाल केले हे मात्र नक्की.

सरकारी यंत्रणा पाठिशी घालते -जिल्हाप्रमुख गणेश वरेकर

ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि सुरेश कुटे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील सामान्य ठेवीदार कंगाल झाला आहे. ठेवी मिळाव्यात यासाठी शिवसेनेने आंदोलनही उभे केले. मात्र बीड जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा आणि भाजपा कुटेंना आणि त्यांच्या उद्योगांना पाठिशी घालत आहे. बीड जिल्ह्यातील ठेवीदारांच्या वाताहतीला केवळ भाजपाच जबाबादार आहे. त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही असे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी म्हटले.

खासदार होताच ठेवी परत मिळवून देणार, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा शब्द

बीड जिल्ह्यातील लाखो ठेवीदार अडचणीत आले आहेत. शेकडो कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. भाजपाने आतापर्यंत असेच गलीच्छ राजकारण केले आहे. त्यांच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्याचा ठेवीदार नागावल्या गेला आहे. मेहनतीचा आणि श्रमाचा पैसा ठेवीदारांना परत मिळाला पाहिजे. पैसे बुडवणार्‍यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत. आपण खासदार होताच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासठी सर्वतोपरी कार्यवाही करणार असल्याचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी म्हटले.