भंडारा: जीएसटीचा फटका… पितळ उद्योगाला अखेरची घरघर; शेकडो कामगार बेरोजगार

>> सूरज बागडे, भंडारा

पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात या उद्योगासाठी हवी तशी झळाळी मिळालेली नाही. आता तर शहरातील पितळ उद्योग हळूहळू हद्दपार होत आहे. उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेले प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत. क्लस्टर समितीला आर्थिक आधार नसल्याने उद्योगाला बळ मिळणार तरी कसे? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. परीणामी शेकडो मजूरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा शहर हे पितळ उद्योगासाठी प्रसिद्ध होते. पितळी धातूची भांडी ही चांगली गुंतवणूक समजली जात असल्याने मुलीच्या लग्नात पितळ, तांबे व कांस्य धातूची पाच तरी भांडी देण्याची परंपरा रूढ झाली होती. बाजारातील किमती वाढल्या तरी ही भांडी विकली जातील अशी आशा येथील कारखानदारांमध्ये होती. जवळपास सहा दशकांपूर्वी श्रीमंत उद्योजकांनी भंडाऱ्यात पितळी प्लेट तयार करण्यासाठी यंत्रांवर आधारित कारखाने सुरू केले. यामध्ये उत्पादनाचा वेग वाढल्याने भंडाऱ्याच्या पितळी भांड्यांची झळाळी संपूर्ण मध्य हिंदुस्थानात पसरली होती. मोटारी व रेल्वेद्वारे मालवाहतूक होत असल्याने दररोज परराज्यांतील व्यापारी येथे माल खरेदीसाठी येत होते. 30 वर्षांपूर्वी शहरात लहान-मोठे सुमारे 20 ते 25 पितळी भांड्यांचे कारखाने होते. त्यावेळचे उच्चशिक्षित असलेले उद्योजक या उद्योगाचा आधार होते.

पितळ उद्योगासाठी पंजाब, रेवाडी, हरयाणा येथून कुशल कामगारांना बोलावले जात होते. कालांतराने अॅल्युमिनिअम, स्टीलच्या भांड्यांची मागणी वाढत गेली. 1990 च्या दशकात आलेल्या प्लास्टिकने सर्वच क्षेत्रांत जोरदार मुसंडी मारल्याने अन्य धातूंसह पितळ तांबे आदींच्या भांड्यांची विक्री कमी झाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढलेली मजुरी आणि कुशल कामगारांचा अभाव यामुळे पितळनिर्मितीवर बंधने आली. कांसे खरेदी करणं सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेले.

तर पितळ कामगारांना कोणत्याही प्रकारचा राजाश्रय नसल्याने परप्रांतांतून येणारे कुशल कामगारही अधिक मोबदला मागतात. उत्पादनावर स्टीलपेक्षा अधिक जीएसटी आकारला असल्याने. हा उद्योग आता हळूहळू कमी कमी झाला असून कोरोना काळापासून पितळ व अन्य धातूंची विक्री 50 ते 55 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. परिणामी उद्योग बंद झाल्याने अनेकांचा रोजगार गेला तर कारागीर देशोधडीला लागले आहेत.

वाढलेले विजेचे दर, जीएसटीचे दर, भासत असल्याने या उद्योगाला उभारी देणे कठीण जाणार आहे. जळाऊ लाकडांच्या किमती या सगळ्यांचा परिणाम पितळ उद्योगावर झाला आहे. या उद्योगासाठी जिल्हा प्रशासनाने क्लस्टर समिती तयार केली. पण समितीलाही पैशांची चणचण भासत असल्याने या उद्योगाला उभारी देणे कठीण वाटत आहे.