गवळींच्या ‘भावना’ पायदळी; मिंधे गटाचे टेन्शन कायम, हिंगोलीत भाजपचा बंडखोर

bhavana gawali mp

महायुतीत उमेदवारीवरून राडे सुरू झाले आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी मुंबईत वर्षा बंगल्यापासून नागपूरपर्यंत खेटे झिजवणाऱया मिंधे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या ‘भावना’ पायदळी तुडवत मिंधेंनी राजश्री पाटील यांना तिकीट दिले आहे. पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यामुळे गवळी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे हिंगोलीत उमेदवार बदलूनही मिंधे गट आणि भाजपात तणाव असून भाजपचे रामदास पाटील यांनी बंडखोरी करत आज अपक्ष अर्ज भरल्याने मिंधे गटाचे टेन्शन वाढले आहे.

सर्वेक्षणाच्या आधारावर मला उमेदवारी नाकारण्यात आली. ते मला मान्य नाही. मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी भूमिका गवळी यांनी घेतली आहे.

अपक्षाला भाजपचे बळ

हिंगोलीत शिंदे गटाचे हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती पण पाटील यांच्या नावाला भाजपकडून विरोध होता. भाजपच्या दबावामुळे झुकत मिंधेंनी हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही हिंगोलीत भाजपची नाराजी कायम आहे. बाबुराव कदमही सक्षम उमेदवार नाहीत असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाबुराव कदम यांच्या नावालाही विरोध झाला. पण ही जागा शिंदे गटाकडेच राहिल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीमुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. रामदास पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अपक्ष नगरसेवक उघडपणे उपस्थित होते. काहीही झाले तरी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे.

गवळी समर्थकांची निदर्शने

यवतमाळ-वाशिममध्ये भाजपच्या दबावामुळे भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या भावना गवळी यांच्या समर्थकांनी निदर्शने केली. यापूर्वी भावना गवळी यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि नागपूरमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज राजश्री पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर यवतमाळमध्ये मिंधेंची सभा झाली. या सभेत तुम्हाला वाऱयावर सोडणार नाही, असे सांगून गवळींची समजूत काढण्याचा मिंधेंनी प्रयत्न केला.

नाशिकचा तिढा कायम

नाशिकमध्ये मिंधे गटाचे हेमंत गोडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांच्यातील उमेदवारीचा तिढा अद्याप कायम आहे. हेमंत गोडसे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. नाशिकमधील जागेबाबत एक-दोन दिवसात निर्णय होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

घरातच कोंडी

मिंधे आणि मिंधेपुत्राची त्यांच्या घरातही कोंडी झाली आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये उमेदवार कोण असणार आणि या जागा कोण लढणार यावरून मिंधे आणि भाजपात एकमत झालेले नाही. कल्याण तुम्हाला हवे असेल तर ठाण्याची जागा आम्हाला सोडा अशी ताठर भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे मिंधे पेचात सापडले आहेत.