भाजपचे पोट भरता भरेना! 23 उमेदवार जाहीर, अजून 7 ते 8 जागांसाठी दबाव

महायुतीत लोकसभेच्या जागांवरून काथ्याकुट सुरूच असताना भाजपने 23 जागांवरील उमेदवार आतापर्यंत जाहीर केले आहेत. भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 22 जागांव्यतिरिक्त चंद्रपूरमधून उमेदवार घोषित केला आहे. याशिवाय आणखी 7 ते 8 जागांसाठी भाजपच्या राज्यातील व केंद्रातील नेत्यांकडून दबाव आहे. निम्म्यापेक्षा अधिक जागा पदरात पडल्यावरही भाजपचे पोट काही भरता भरत नाही, अशी चर्चा महायुतीचे भागीदार असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात सुरू आहे.

महायुतीत कोण किती जागा लढवणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसतानाही भाजपने मागच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळालेल्या 23 पैकी 22 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये विद्यमान 5 खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारत नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. याशिवाय मोदी लाटेत पराभव पत्करावा लागलेल्या चंद्रपूरच्या जागेवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले आहे. गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली होती, पण विद्यमान खासदार अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले आहे.

महायुतीत भाजप 30 ते 31 जागा, शिंदे गट 10 ते 12 आणि अजित पवार गट 4 ते 5 आणि रासप, मनसे यांना प्रत्येकी एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे.

ठाणे, मावळसाठी दबाव
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचाच उमेदवार असावा अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. मात्र, शिंदे गटाकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे हा मतदारसंघ सोडा, असा दबाव भाजपकडून टाकला जात आहे. येथून निरंजन डावखरे, संजीव नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मावळचे विद्यमान खासदार शिंदे गटाकडे असले तरी येथून कमळ चिन्हावर उमेदवार देण्यात यावा, असा आग्रह भाजपचा आहे.

नाशिकसाठी घासाघीस
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारील भाजपकडून मोठय़ा प्रमाणात विरोध आहे. त्यातच अजित पवार गटाकडूनही या जागेसाठी आग्रह धरला जात आहे. नाशिकच्या बदल्यात शिंदे गटाकडे सध्या नाही असा एखादा मतदारसंघ देण्याबाबत महायुतीच्या नेत्यांत घासाघीस सुरू आहे.

गोड बोलून सातारा घेतले
सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप तसेच अजित पवार गटाकडून दावा केला जात होता. भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे यासाठी दिल्लीत तळ ठोकून होते. दिल्ली व राज्यातील भाजप नेत्यांनी अजितदादा यांच्याशी गोडबोलून सातारची जागा पदरात पाडून घेतली.