गांधी किंवा गोडसे यापैकी एकाची निवड करू शकत नाही! माजी न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांचे वादग्रस्त विधान

नथुराम गोडसेने गांधी हत्या का केली, याच्या मुळाशी जायलाच हवे. त्यामुळे गोडसे किंवा गांधी यापैकी एकाची निवड करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान माजी न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांनी केले आहे. दरम्यान, काँग्रेसने गंगोपाध्याय यांच्या विधानावर आक्षेप घेतला असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश असलेले अभिजीत गंगोपाध्याय हे नुकतेच राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. नुकतेच त्यांनी गोडसे आणि गांधींवर संतापजनक वक्तव्य केले. गोडसेने गांधी हत्या का केली याच्या मुळाशी जायला पाहिजे. त्यामुळे गोडसे किंवा गांधी यापैकी एकाची निवड करता येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. गंगोपाध्याय यांच्या विधानामुळे धुरळा उठला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर न्या. गंगोपाध्याय यांच्या विधानावर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांचे विधान स्वीकारता येणार नाही. त्यांनी महात्मा गांधी यांचा वारसा जपण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. त्यांचे विधान सामजिक तेढ निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीही रमेश यांनी केली आहे.