टीव्हीवरील राजकीय चर्चेचा कार्यक्रम बनला कुस्तीचा ‘आखाडा’, भाजप-काँग्रेस नेते, कार्यकर्ते एकमेकांना भिडले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील एका मैदानात स्थानिक टीव्ही चॅनेलद्वारे आयोजित राजकीय चर्चेदरम्यान तुफान राडा झाला. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आमनेसामने आले आणि एकमेकांवर लाठ्या-काठ्या, प्लास्टिकच्या खुर्च्यांनी हल्ला केला. यात काही जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जबलपूर शहराचे एसपी पंकज मिक्षा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बाजूच्या अन्य काही कार्यकर्त्यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवणीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती एसपी पंकज मिश्रा यांनी दिली.

नक्की काय घडलं?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांना घेऊन चर्चासत्र आयोजित केले जात आहे. जबलपूरमध्येही शनिवारी स्थानिक टीव्ही चॅनेलने भवारलाल मैदानात राजकीय चर्चेचे आयोजन केले होते. यावेळी काही मुद्द्यांवरून भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर लाठ्या-काठ्यासह खुर्च्यांनी मारहाण झाली.

आरोप-प्रत्यारोप

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप भाजप आमदार अभिलाष पांडे यांनी केला. तर चर्चेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस समर्थकासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर हा राडा झाला आणि भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली, असा आरोप काँग्रेसचे माजी आणदार विनय सक्सेना यांनी केला.