पॉलिटिकल सपोर्ट समोर आणा, अंबादास दानवे यांच्याकडून पीडित प्रियाची विचारपूस

प्रिया सिंग हिची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी मिंधे सरकार व त्यांच्या पोलीस यंत्रणेचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, या दुर्घटनेत तरुणीचे हात व पाय प्रॅक्चर झाले आहेत. एखाद्या मुलीला थेट गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. याचा अर्थ या राज्यात महिला सुरक्षित आहेत काय? सामान्य माणसाला कुणी काठीने मारले तर लगेच गुन्हा दाखल केला जातो. मात्र या प्रकरणात एवढी गंभीर घटना घडूनही 307 कलम का लावले नाही? कायदा व सरकार तुमच्या घरचे आहे काय, असा थेट प्रश्नही त्यांनी पोलिसांना विचारला.

हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या प्रकरणात पॉलिटिकल सपोर्ट आहे असे म्हणतात. तो कोणता पॉलिटिकल सपोर्ट आहे, हे एकदा जनतेसमोर येऊ द्या, असे आव्हानच त्यांनी केले. ठाण्यासारख्या मोठय़ा शहरामध्ये पोलीस अशा प्रकारे वागत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे. प्रियाला गाडीखाली चिरडण्यास सांगणारा प्रियकर अश्वजीत गायकवाड हा कोणाचा मुलगा आहे, हे माहीत नाही, पण पीडितेला लवकरात लवकर न्याय द्या, अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरून जाब विचारू, असेही दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, महिला संघटक प्रमिला भांगे, देवगड तालुका संपर्कप्रमुख संतोष कडू, ठाणे शहर समन्वयक तुषार रसाळ, विभागप्रमुख संजय भोई, अरविंद भोईर, उपविभागप्रमुख संदीप धरणे, महिला आघाडी नंदा शिंदे, शहर विधानसभा युवाधिकारी किरण जाधव, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा युवाधिकारी राजेश वायाळ-पाटील, शाखाप्रमुख नागेश महाडिक आदी उपस्थित होते.

पोलीस अधिकाऱयांना झापले

राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे संपूर्ण महाराष्ट्रात जिथे अन्याय होईल तिथे जात असतात. त्यांचा दौरा जेथे असतो त्या भागातील संबंधित अधिकाऱयांनी उपस्थित राहावे असे संकेत आहेत. मात्र दानवे हे पीडित तरुणीची भेट घेण्यासाठी खासगी रुग्णालयात येणार असल्याचे माहीत असूनही कासारवडवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच उपायुक्त आलेच नव्हते. याबाबत स्वतः दानवे यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना पह्न करून चांगलेच झापले.