भायखळय़ातील पारशी कुटुंबीयांच्या घरी 20 वर्षांपासून होतेय बाप्पाचे आगमन

केवळ हिंदूच नाही तर इतर धर्मीयदेखील बाप्पाची मनोभावे पूजा करताना दिसतात. भायखळा येथे राहणाऱ्या देलझान छोई यांच्या घरी गेल्या 20 वर्षांपासून बाप्पाचे आगमन होत आहे. छोई कुटुंबीयांची बाप्पावर नितांत श्रद्धा आहे. बाप्पा आपली मनोकामना पूर्ण करतो यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे.

प्रभाग क्र. 210 मधील रुस्तम बाग पारसी वसाहतीतील राहणाऱ्या देलझान छोई आणि त्यांची पत्नी शहनाज यांच्या घरी गेली 20 वर्षे  गणपती बाप्पाचे मोठय़ा भक्तिभावाने आगमन होते. दरवर्षी गणेशोत्सवात ते निरनिराळे देखावे सादर करतात. इस्रोची चांद्रयान-3 ही मोहीम सर्व हिंदुस्थानींसाठी मोठय़ा अभिमानाची बाब आहे. याचेच महत्त्व लक्षात घेता छोई कुटुंबीयांनी यंदा खास चांद्रयान-3 चा देखावा साकारला आहे. शिवसेना उपनेते, कामगार नेते मनोज जामसुतकर, भायखळा उपविभाग संघटिका आणि माजी नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी छोई कुटुंबीयांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपशाखाप्रमुख रॉनी बगवाडियादेखील उपस्थित होते.