दुबेंच्या दिंडोऱ्यानंतर महुआ मोईत्रा कडाडल्या; आधी अदानींवर सीबीआयने एफआयआर दाखल करावा

आपण केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीमुळे लोकपाल यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले असल्याचा दिंडोरा भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर पिटताच, आधी 13 हजार कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळ्यात अदानींवर सीबीआयने एफआयआर दाखल करावा, मग माझी पादत्राणे मोजायला यावे, असे महुआ यांनी ठणकावले आहे.

संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध आपण केलेल्या तक्रारीमुळे लोकपालनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले असल्याचा दावा दुबे यांनी केला होता. त्यावर चाळीस मिनिटांच्या आत महुआ यांनी एक्सवरच सणसणीत प्रत्त्युतर दिले. दुबे यांनी दावा केला असला तरी लोकपालांकडून मात्र कोणतेही अधिकृत निवेदन करण्यात आलेले नाही.

काय म्हणाल्या महुआ…
सर्वप्रथम 13 हजार कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळ्यात सीबीआयने अदानीविरुद्ध एफआयआर दाखल करावा. संशयास्पद विदेशी गुंतवणूकदार मालकी (चीन आणि अमिरातीसह) असलेल्या अदानी समूहातील कंपन्यांना भारतीय बंदरे-विमानतळ खरेदी करण्यासाठी गृह खात्याची मंजुरी मिळते कशी, हा खरा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.
लोकपाल अभी जिंदा है, अशी खिल्लीही त्यांनी अन्य एका पोस्टमध्ये उडवली आहे.