बहुभाषिक नाटकांची पर्वणी, 11 सप्टेंबरपासून नेहरू सेंटरचा थिएटर महोत्सव

मुंबईकरांना वैविधपूर्ण, विविध भाषेतील नाटके एकत्र पाहता यावीत यासाठी वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने दरवर्षी थिएटर फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यंदा 11 ते 15 सप्टेंबर यादरम्यान हा महोत्सव रोज सायंकाळी 7 वाजता नेहरू सेंटरच्या नाटय़गृहात होणार आहे. या वर्षी फेस्टिवलसाठी एकूण पाच नाटकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात वामन केंद्रे लिखित, दिग्दर्शित ‘गजब तिची अदा’ हे नाटक 11 सप्टेंबरला सादर होईल. ‘अंत-अनंत’ हे नाटक विजय कुमार दिग्दर्शित असून ते हिंदीमध्ये 12 सप्टेंबरला होणार आहे. ‘हमारी नीता की शादी’ या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक वीना बक्षी असून 13 सप्टेंबरला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. 14 सप्टेंबरला ‘माधुरी दीक्षित’ हे गुजराती नाटक होणार आहे. ‘मिस्टर ऍपल’ हे 15 सप्टेंबर रोजी होईल. थिएटर फेस्टिवल मुंबईकरांना विनामूल्य पाहता येईल. त्यासाठी नेहरू सेंटरच्या बुकिंग काऊंटरवर विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध असतील.