चांद्रयान-3 झेपावले चौथ्या कक्षेत

हिंदुस्थानची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यानाचे गुरुवारी चौथे ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी झाले. म्हणजेच चांद्रयानाने चौथ्या कक्षेत यशस्वीपणे झेप घेतली. दरम्यान, 20 जुलै 2023 रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान चांद्रयान पुढच्या कक्षेत झेप घेईल असे ‘इस्रो’ अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.

14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यानाने पहिली फेरी पूर्ण करून पहिले ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर यशस्वीरीत्या पार केले होते. त्यानंतर 17 जुलै रोजी दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर हे यान पृथ्वीपासून 41,603 बाय 226 किलोमीटर या कक्षेत पोहोचले. त्यानंतर मंगळवारी यान तिसऱ्या कक्षेत झेपावले तर गुरुवारी चौथ्या कक्षेपर्यंतही यशस्वीरीत्या मजल मारली. दरम्यान, 31 जुलैपर्यंत चांद्रयान-3 एक लाख किलोमीटरपर्यंतचा टप्पा करण्याचे उद्दिष्ट आहे.  23 किंवा 24 ऑगस्टला विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करू शकते असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.