आनंदाचा क्षण – चांद्रयान-3 चे यशस्वी उड्डाण, 23 ऑगस्टला सायंकाळी 5.47 वाजता चंद्रावर लॅण्डिंग होणार

ज्या क्षणाची वाट अवघा देश पाहत होता तो आनंदाचा क्षण आज आला. दुपारी ठिक 2.35 वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चांद्रयान-3 अवकाशात झेपावले. चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणाचे लाईव्ह प्रक्षेपण कोटय़वधी जनतेने पाहिले. इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, 42 दिवसांच्या प्रवासानंतर 23 ऑगस्टला सायंकाळी 5.47 वाजता चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग होणार आहे.

2019 ला चांद्रयान-2 मोहिम अंतिम टप्प्यात थोडक्यात पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेकडे देशवासियांचेच नाही तर अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. ‘इस्रो’चे अनेक शास्त्रज्ञ, संशोधक चांद्रयान-3 साठी अहोरात्र काम करीत होते. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान या मोहिमेसाठी वापरण्यात आले आहे.

चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट लाँच व्हेईकल मार्क-3 (एलव्हीएम-3) सज्ज होते. दुपारी 2.35 वाजता लाँचपॅडवरून यशस्वी उड्डाण केले.
अवकाशात झेपावल्यानंतर 16 मिनिटांमध्ये एलव्हीएम-3 रॉकेटमधून चांद्रयान-3 विलग झाले. पृथ्वीभोवती 170 बाय 36500 किमीची वर्तुळाकार कक्षा प्राप्त केली.
हा आनंदाचा क्षण कोटय़वधी जनतेने डोळ्यांत साठवला. सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुढील काही दिवस चांद्रयान-3 पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. हळूहळू कक्षा विस्तारीत होतील. यानाची गती वाढेल आणि ते चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल.
चंद्राच्या जवळ पोहोचल्यानंतर लँडर चंद्रावर टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.

चंद्रावर कधी उतरणार

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-3 चा प्रवास 42 दिवसांचा असणार आहे.
23 ऑगस्टला सायंकाळी 5.47 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी अपेक्षा असल्याचे इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी सांगितले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर चालणे.
ही मोहिम पूर्णपणे यशस्वी झाल्यास रोव्हरकडून चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होईल.

कोटय़वधी जनतेने ऐतिहासिक क्षण टिपला
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे सकाळपासून शास्त्रज्ञ, संशोधक आणि मान्यवरांची उपस्थिती होती. इस्रोचे अनेक माजी चेअरमन, शास्त्रज्ञ, विशेष निमंत्रित होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह ही उपस्थित होते. ‘इस्रो’चे चेअरमन एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांची टीम या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

प्रोजेक्ट डायरेक्टर यांना आनंदाश्रू
उड्डाणानंतर लाँचर मॉडय़ूलपासून चांद्रयान-3 वेगळे झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि शास्त्रज्ञांनी एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर पी. वीरा मुथुवेल यांना आनंदाश्रु आले. नेमके काय बोलायचे हेच ते विसरून गेले. इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ हेही भावनिक झाले होते.