चांद्रयान-3 विक्रम लँडरकडून चंद्राचे ताजे फोटो शेअर; जाणून घ्या काय आहे यांचं वैशिष्ट्य

chandrayaan-3-moon

चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने घेतलेल्या चंद्राचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अंतराळ संशोधकांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. पृथ्वीच्या पृष्ठ भागावरून न दिसणाऱ्या अशा दक्षिण ध्रुवीय भागातील काही प्रमुख विवरांची यातून माहिती मिळत आहे. बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात हे विक्रम लँडर उतरेल. हिंदुस्थानसह मानव इतिहासातील ऐतिहासिक घटना असेल. लँडिंगसाठी योग्य जागा शोधण्यात मदत मिळावी या उद्देशानं एका कॅमेर्‍याद्वारे हे फोटो घेण्यात आले आहेत.

‘लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा’ (LHDAC) द्वारे कॅप्चर केलेल्या चंद्राच्या दुसऱ्या बाजूच्या क्षेत्रातील हे फोटो आहेत. हा कॅमेरा सुरक्षित लँडिंगसाठीची जागा शोधण्यात मदत करतो. दगड किंवा खोल दरी ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो, असं ISROनं सांगितलं आहे.

गेल्या शनिवारी टिपलेल्या प्रतिमांमधून दिसलेले विवर ‘हेन, बॉस एल, मारे हम्बोल्डटियनम आणि बेलकोविच’ असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लँडर बुधवारी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरणार आहे. हे यश मिळवल्यास हिंदुस्थान अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या रांगेत स्थान मिळवेल. चंद्रावर यान उतरवणारा हिंदुस्थान चौथा देश असेल.