वानखेडेवर चेन्नईची विजय गर्जना, पथिराणाच्या भेदकतेपुढे रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ

>> मंगेश वरवडेकर

12 षटकांत 2 बाद 118 अशी जबरदस्त धावसंख्या असताना रोहित शर्मा आणि सहकाऱयांना चेन्नईच्या गोलंदाजांनी फटक्यांपासून रोखत 4 षटकांत केवळ 17 धावा देत मुंबईला विजयापासून दूर नेण्याची किमया दाखवली. मथिशा पथिराणाने सुसाट आणि भेदक मारा करत चार विकेट घेत वानखेडेवर मुंबईकरांना चेन्नईची विजयी गर्जना केली. खेळपट्टीवर रोहित शर्मा असूनही मुंबईला 20 धावांनी पराभव सहन करावा लागला आणि त्याची 105 धावांची खेळी व्यर्थ ठरली. हा चेन्नईचा चौथा विजय, तर मुंबईचा चौथा पराभव ठरला.

धोनीने शेवटच्या 4 चेंडूंत केलेली 20 धावांची खेळी निर्णायक ठरली. मुंबईलाही विजयासाठी 20 धावाच कमी पडल्या. चेन्नईच्या 207 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशानने जोरदार फटकेबाजी करत 7 षटकांत 70 धावांची सलामी दिली. पथिराणाने आपल्या पहिल्याच चेंडूवर इशान किशनला बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले आणि तिसऱया चेंडूवर सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद करून मुंबईला हादरवले. या दोन धक्क्यानंतर रोहितने तिलक वर्मासह (31) धावांची भागी रचत मुंबई विजयपथावर नेले होते, पण पथिराणाने ही जोडी पह्डून मुंबईचा सारा डावच उधळून लावला. हार्दिक पंडय़ा, टीम डेव्हिड आणि शेफर्ड रोमारिओ यांना गुंडाळत रोहितच्या फटक्यांनाही लगाम घालत चेन्नईने सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. रोहितने आपले 60 चेंडूंत शतक साजरे केले तरी अन्य फलंदाजांनी निराशा केल्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांपुढे तो विजयासाठी आवश्यक धावगती राखू शकला नाही. त्याने 63 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 105 धावा केल्या. हे यंदाच्या आयपीएलमधील तिसरे शतक ठरले.

तत्पूर्वी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेने वैयक्तिक झंझावाती अर्धशतकांसह तिसऱया विकेटसाठी केलेली 90 धावांची भागी आणि महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात चार चेंडूंच्या षटकारबाजीने चेन्नई सुपर किंग्जला यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 बाद 206 अशी आव्हानात्मक मजल मारली होती.

कर्णधार हार्दिक पंडय़ाने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीची संधी दिली. जिराल्ड कोत्झीने आपल्या पहिल्याच षटकांत अजिंक्य रहाणेला बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले, पण त्यानंतर चेन्नईच्या सर्व फलंदाजांनी वानखेडेच्या खेळपट्टीला साजेशी फलंदाजी केली. रहाणेनंतर रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या डावाला आकार देणारी दणकेबाज खेळी करत 52 धावांची भागी रचली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर ऋतुराज आणि शिवम दुबेने चेन्नईच्या डावाला खऱया अर्थाने वेगवान केले. दोघांनीही मुंबईच्या गोलंदाजांना पह्डून काढताना संघाचा धावफलक दीडशेपार नेला.

गायकवाडने वानखेडेवर षटकारांची उत्तुंग आतषबाजी करताना 5 षटकार ठोकले. त्याने 33व्या चेंडूवर पन्नाशी साजरी केली. त्याच्यामागोमाग शिवमनेही मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत 28 चेंडूंत अर्धशतकी टप्पा गाठला. हे त्याचे आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठरले. 40 चेंडूंत 69 धावा केल्यानंतर ऋतूची खेळी पंडय़ाने संपवली. चेन्नई दोनशेपासून दूर राहणार असे वाटत असताना शेवटचे चार चेंडू खेळायला आलेल्या धोनीने पंडय़ावर तुटून पडताना षटकारांची हॅटट्रिक साजरी करत चेन्नईला द्विशतक गाठून दिले. त्याने अवघ्या 4 चेंडूंत 20 धावा केल्यामुळे चेन्नई 206 धावांपर्यंत पोहचू शकली. शिवमने 38 चेंडूंत 66 नाबाद धावा केल्या.

वानखेडे धोनीमय जाहला

आपल्या लाडक्या महेंद्रसिंग धोनीचा वानखेडेवरचा शेवटचा सामना आहे. याची सर्वच चाहत्यांना कल्पना होती. त्यामुळे आज वानखेडे चक्क धोनीमय झाले होते. आज मुंबई इंडियन्सला आव्हान देता येतील यापेक्षा अधिक प्रेक्षक चेन्नईची पिवळी आणि धोनीचे नाव असलेली जर्सी परिधान करून आले होते. आज वानखेडेच्या परिसरात मुंबई इंडियन्सच्या निळय़ाच नव्हे तर चेन्नईच्या पिवळय़ा जर्सीसुद्धा हजारोंच्या संख्येने विकल्या गेल्या होत्या. एका टी शर्ट विव्रेत्याने सांगितले की, आज मुंबईपेक्षा चेन्नई आणि धोनीच्या नावाच्या टी शर्टला तुफान मागणी होती. धोनीला अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने जमा झालेल्या क्रिकेट चाहत्यांना धोनीने सरप्राइज गिफ्ट दिले. शेवटच्या षटकात मारलेल्या षटकारांची हॅटट्रिक पाहून चाहते अक्षरशः भारावले होते. पुन्हा आपला धोनी वानखेडेवर पिवळय़ा जर्सीत दिसणार नाही, याची त्यांना जाणीव झाली आहे.