…अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संभाजीराजेंची सरकारकडे मागणी

sambhaji chhatrapati bhujbal

अजित पवार गटातून राज्यात पुन्हा मंत्री बनलेल्या छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र जालन्यात आज झालेल्या ओबीसी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांना लक्ष्य केलं. त्यांच्या अशा भूमिकेमुळे संभाजीराजे छत्रपती यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भुजबळांची भूमिका ही राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न करत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. तसंच भुजबळांची हकालपट्टी केली आहे.

‘छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत’, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

‘सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी’, अशी मागणी देखील त्यांनी वेळी केली.