अधिछात्रवृत्ती फेलोशिपसाठी पूर्व परीक्षेत 2019 मधील पेपरची केली कॉपीपेस्ट, नव्याने परीक्षा घेण्याची मागणी

सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या अधिछात्रवृत्ती फेलोशिपसाठी आज रविवारी पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी काढण्यात आलेला पेपर हा २०१९ मधील पेपरचीच कॉपी असल्याचे उघडकीस आले. परीक्षेचा पेपर झाल्यानंतर ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यशासनाच्या वतीने मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी, एससी विद्यार्थ्यांसाठी बार्टी तर ओबीसी प्रवर्गासाठी महाज्योतीद्वारे फेलोशिपसाठी परीक्षा घेण्यात येते. यासाठी राज्यातील २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. कोल्हापूर, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यात महाज्योतीसाठी १३८३, सारथीसाठी १३२९, बार्टीसाठी ८१६ जणांचे अर्ज परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. शहरात देवगिरी महाविद्यालयाच्या केंद्रावर सकाळी १० ते ११ यावेळेत शंभर गुणांची ऑनलाईन ही परीक्षा घेण्यात आली. पेपर झाल्यावर परीक्षार्थींनी माहिती घेताच धक्कादायक प्रकार झाल्याचे समोर आले. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या सेट पेपरमधील एकचीच प्रश्नपत्रिका कॉपीपेस्ट करत ही परीक्षा घेण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. एवढेच नव्हे तर प्रश्नपत्रिकेचा संच असलेले पाकीट बंद देणे अपेक्षित असताना ते पाकीट उघडे होते. यामुळे पेपर फुटण्याचीही शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने नवीन पेपर काढण्याचीही तसदी घेतली नाही. जुनाच पेपर कॉपी करून २०२३ च्या परीक्षेसाठी कॉपीपेस्ट करण्यात आला. यापूर्वी महात्योती या स्वायत्त संस्थेत मोठा गैरव्यवहार झाला होता. रविवारी पुन्हा नव्याने तोच प्रकार पहायला मिळाला. सारथी, बार्टी आणि महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती फेलोशिप देण्यासाठी पूर्व परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना, धाराशिव, सोलापूर येथून परीक्षेसाठी विद्यार्थी आले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेतील या गोंधळाबाबत केंद्रावरील निरीक्षकांच्यामार्फत सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या मुख्यव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवला असून, ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.