छत्रपती संभाजीनगर – टेलरच्या दुकानाला आग, सात जणांचा गुदमरून मृत्यू

छावणी परिषदेतील दाणा बाजारातील एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यातील टेलर्सच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत पहिल्या मजल्यावर राहणार्‍या एका कुटुंबातील तब्बल ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. या अग्नितांडवात दोन चिमुकल्यांसह 3 महिला व दोन पुरुषांचा मृत्यू झाला. रमजान महिन्यात मुस्लिम कुटुंबाच्या या अपघाती मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

छावणी परिसरातील दाणा बाजार गल्लीत महावीर जैन मंदिरच्या बाजूला अस्लम शेख यांचे टेलर्स कामाचे दुकान आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर सोहेल अब्दुल अजीज याची आई हमिदा बेगम अब्दुल अजीज शेख, पत्नी रेशमा सोहेल शेख, भाऊ वसीम अब्दुल अजीज शेख, भावजयी तन्वीन वसीम शेख तसेच वसीम शेख याची असीम आणि महनूर ही दोन मुले असे एकूण ७ जणांचे हे कुटुंब राहत होते. सोहेल हा छावणीतील एका गॅरेजमध्ये काम करत होता. वसीम दूध विक्रीचा व्यवसाय करून आपला कुटुंबाचा उदानिर्वाह करत होता.

सोहेल याच्या पत्नीची तब्येत बरी नसल्याने रात्री 11.30 वाजता औषधाच्या दुकानातून काही गोळ्या औषध खरेदी करून तो घरी गेला होता. रात्री नेहमीप्रमाणे सगळे कुटुंब झोपलेले असताना पहाटे 4 वाजेच्या सुमारास अचानक तळ मजल्यातील टेलर्स दुकानात चार्जिंग लावलेल्या दुचाकीच्या वायरिंगमध्ये स्पार्क झाल्याने दुकानास अचानक आग लागली. आगीचा धूर बाहेर पडत असताना असलम शेख यांचे कुटुंब तत्काळ बाहेर पळाले. त्यांनी वरच्या मजल्यावर असलेल्या सोहेल यांच्या कुटुंबीयांना आवाज दिला. मात्र, कोणीच प्रतिसाद न दिल्याने घाईघाईत ते स्वत:चा जीव वाचवीत इमारतीच्या बाहेर पळाले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस तसेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या सोहेल शेख यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवाने गुदमरून मृत्यू झाला होता.

शॉर्टसर्किटमुळे लागली आग
अस्लम शेख टेलस यांच्या दुकानात इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगला लावलेली होती. या दुचाकीच्या चार्जरमध्ये शॉटसर्किट झाल्याने किंवा बोर्डातील वायरिंगमुळे ही आग लागली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातून ही आग पसरून कपड्यांना लागली असावी. त्यामुळे अचानक ही आग भडकल्याने मोठी दुर्घटना घडली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घेतली धाव
आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या पथकाने अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली, मात्र दुर्दैवाने या अग्नितांडवात 7 जणांचा मृत्यू झाला.

तिसर्‍या मजल्यावरील भाडेकरूंनी वाचविला प्राण
या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर इरफान खान व त्याची पत्नी दोघे राहतात. आग लागल्याचे लक्षात येताच इरफान याने पत्नीला झोपेतून उठवून शेजारी असलेल्या टेरेसवर उड्या मारल्या. त्यामुळे हे दोघेही या अग्नितांडवापासून बालंबाल बचावल्याची माहिती इरफान खान याने दिली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची घटनास्थळी भेट
छावणीत आग लागल्याची माहिती मिळताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणची पाहणी करून कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, किशोर कच्छवाह, अनिल जैस्वाल, दिनेश शर्मा, मयंक पांडे, पवन पांडे, संतोष बडजाते, अशोक सायन्ना यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ईदसाठी घेतले होते सोहेलने नवीन कपडे
अवघ्या काही दिवसांवर रमजान ईद आली असल्याने सोहेल याच्या कुटुंबाची ईदीची तयारी सुरू होती. नुकतेच त्याने नवीन कपडे खरेदी केले होते. हे नवीन कपडे ईदीसाठी वापरण्यात येणार होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नातेवाईक, मित्रपरिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोहेलच्या वडिलांचा झाला होता खून
तिसगाव परिसरात गाय चोरण्याच्या संशयावरून नागरिकांनी केलेल्या मारहाणीत सोहेल याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या कुटुंबाची जबाबदारी सोहेलच्या आईवर होती. कालांतराने मुले कर्ती झाल्यापासून घराची जबाबदारी या मुलांवर आलेली होती.