कोस्टल रोडला धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव, उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू

मुंबईला वेगवान करणारा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘कोस्टल रोड’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ असे नावही अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. टोल फ्री आणि सिग्नल फ्री असलेल्या या मार्गातील प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी लिंक अशा एकूण 10.58 किमीच्या मार्गापैकी वरळी ते मरीन ड्राइव्ह हा 9 किमी मार्ग आज खुला करण्यात आला. कोस्टल रोडमुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 9 ते 10 मिनिटांत होणार असून वेळेची 70 टक्के तर इंधनाची 34 टक्के बचत होणार आहे.

मुंबई दररोज शेकडो वाहनांची भर पडत असल्यामुळे प्रचंड वाहतूक काsंडीचा सामना वाहनचालक, मुंबईकरांना करावा लागत आहे. शिवाय वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून कोस्टल रोड बांधण्याचा पर्याय समोर आला. यानुसार पालिकेच्या माध्यमातून 14 हजार कोटी खर्च करून कोस्टल रोडचे नियोजन करण्यात आले. यानुसार ऑक्टोबर 2018 पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. यानुसार नोव्हेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र प्रकल्पाविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका निकाली निघण्यात गेलेला वेळ, स्थानिक मच्छीमारांनी पिलरमधील 60 मीटरचे अंतर 120 मीटरपर्यंत करण्याची केलेली मागणी आणि कोरोना काळ यामुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण झाले. मात्र सद्यस्थितीत एकूण प्रकल्पापैकी 86 टक्के काम पूर्ण झाल्यामुळे वरळी ते मरिन ड्राइव्ह ही चार लेनची दक्षिण बाजू आज सुरू करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार
कोस्टल रोडवर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घोषणा केली. हा पुतळा उभारण्यासाठी जागेचा लवकरच शोध घेऊन काम पूर्ण केले जाईल, असे ते म्हणाले.

मालवाहू, जड वाहनांना बंदी
कोस्टल रोडवर सर्व प्रकारातल्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. यामध्ये ट्रक्टर, मालवाहू वाहने, ट्रेलर, मिक्सर या वाहनांचा समावेश आहे.

सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटी
मुंबईसह देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिर आणि परिसराचा विकास उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करण्यात येईल. यासाठी पालिकेमार्फत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय मिंध्यांनी लाटले
कोस्टल रोडची संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असून या प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत ऑक्टोबर 2018 मध्ये झाले. असे असताना मिंध्यांनी निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाचे केवळ श्रेय लाटण्यासाठी प्रकल्प पूर्ण होण्याआधीच लोकार्पणाचा घाट घातल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हे काम आपल्यामुळे मार्गी लागल्याचा दावा आज केला. मात्र घटनाबाह्य मिंधे सरकारने शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्प पूर्ण झाला नसताना घाईघाईने लोकार्पण केल्याची टीका शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मे महिन्यात पूर्ण क्षमतेने प्रवास
सद्यस्थितीत केवळ वरळीपासून मरीन ड्राइव्ह असा प्रवास फक्त एका बाजूने विना सिग्नल करता येणार आहे. शनिवार-रविवार ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल.
तर वाहतूक बंद असलेल्या वेळेत प्रकल्पाचे शिल्लक काम वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण प्रकल्प मे 2024 पर्यंत पूर्ण करून खुला करण्यात येणार आहे.