काँग्रेसचे दिल्ली, पंजाबसाठी उमेदवार जाहीर; कन्हैया कुमार ईशान्य दिल्लीतून

काँग्रेसने रविवारी दिल्ली आणि पंजाबमधील लोकसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, ईशान्य दिल्ली मतदारसंघातून कन्हैया कुमार, तर जेपी अग्रवाल यांना चांदणी चौक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना जालंधर-एससी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

कन्हैय्या कुमार यांचा सामना भाजपच्या मनोज तिवारी यांच्याशी होणार आहे. उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा जागेसाठी पक्षाने माजी खासदार उदित राज यांच्या नावाची घोषणा केली.

पंजाबमध्ये पक्षाने अमृतसरमधून विद्यमान खासदार गुरजीत सिंग औजला आणि फतेहगढ साहिब (एससी) लोकसभा मतदारसंघातून अमर सिंग यांना उमेदवारी दिली. माजी खासदार धरवीर गांधी पटियाला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान विंगचे प्रमुख सुखपाल सिंग खैरा यांना संगरूर लोकसभा मतदारसंघातून आणि जीत मोहिंदर सिंग सिद्धू यांना भटिंडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उभे केले आहे.