Lok Sabha Elections 2024 – नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार, कारवाईची केली मागणी

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध अनेक मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीग छाप असल्याची टीका केल्याने काँग्रेसने आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर आणि राजस्थान येथील निवडणूक प्रचाराच्या सभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी बोलले होते. त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लीम लीग छाप असल्याचं म्हटलं होतं. तसंच, या जाहीरनाम्यावर डाव्या विचारसरणीचा दबाव असल्याचंही म्हटलं होतं.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्टवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, माझे सहकारी सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, पवन खेरा आणि गुरदीप सप्पल यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यांनी एकूण सहा तक्रारी आयोगाकडे दाखल केल्या आहेत. त्यापैकी दोन तक्रारी पंतप्रधानांविरोधात आहेत. निवडणूक आयोगाने सर्व पत्रांना समान संधी देणं गरजेचं आहे. आम्ही आशा करतो की निवडणूक आयोग आपल्या संवैधानिक आदेशाचं पालन करेल. या सरकारचा बुरखा फाडण्यासाठी आम्ही सगळे राजकीय आणि कायदेशीर मार्ग अवलंबू , असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात जे काही बोलले, त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याला खोटं ठरवत आहेत. हे अतिशय खेदजनक आहे. तुम्ही एखाद्या पक्षाच्या विचारधारेशी असहमत असू शकता. पण, एका राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाला, जो पक्ष राष्ट्रीय आंदोलनात सहभागी झाला आहे, त्याच्या जाहीरनाम्याला खोटं म्हणणं चूक आहे, आम्ही निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे, असं खुर्शीद म्हणाले आहेत.