कलगीतुरा होतच असतो, पण टीएमसीसाठी दरवाजे कायम खुले!- जयराम रमेश

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, ममता बॅनर्जी यांचा पक्ष राज्यातील 42 लोकसभा जागा स्वबळावर लढेल.

एकीकडे टीएमसीने स्वबळाचा नारा दिला असला तरी दुसरीकडे काँग्रेसने अद्यापही आशा सोडलेली नाही. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत बोलताना म्हटले की, टीएमसीशी चर्चा सुरू आहे. भाजपचा पराभव हे पहिले उद्दिष्ठ असल्याचे ममता बॅनर्जी यांचेही मत आहे. कलगीतुरा तर होतच राहतो.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना काँग्रेसनेच पहिल्यांदा खासदार केले होते. त्यांच्या पक्षाचे नाव बघा. त्यात तृणूलही आहे आणि काँग्रेसही आहे. काँग्रेसचे दरवाजे टीएमसीसाठी कायम खुले आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांचा आदर करतो. आम्हाला आशा आहे की पलटूराम (नितीश कुमार) आणि आरएलडी सोडून इंडिया आघाडीतील सर्व 26 पक्ष एकजुटीने निवडणूक लढतील.

ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत निवडणूक एकत्र लढण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. अर्थात त्याला अंतिम स्वरुप द्यायला वेळ लागला. आज आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीही अधिकृत घोषणा होईल. वारंवार असे बोलले जात होते की काँग्रेस झोपली असून आघाडीमध्ये त्यांना रस नाही. परंतु मी नेहमीच म्हणतो की याला वेळ लागतो, असेही जयराम रमेश म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव 25 फेब्रुवारी रोजी आग्रा येथे या यात्रेत सहभागी होतील अशी आशा असल्याचेही जयराम रमेश म्हणाले. अखिलेश यादव यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचेही ते म्हणाले.