नेहरू फक्त बोलत नव्हते, तर करूनही दाखवत होते! काँग्रेसचे सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

हिंदुस्थानने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -3 उतरवून जागतिक स्तरावरील अंतराळ संशोधनात एक विक्रम घडवला. या विक्रमाचं जगभरातून कौतुक होत असताना सत्ताधाऱ्यांपैकी काहींनी 2014नंतर अंतराळ संशोधनात प्रगती झाल्याचा दावा केला होता. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे फक्त मोठ मोठ्या गप्पा करत नव्हते तर महत्त्वाचे निर्णयही घेत होते, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, नेहरू हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला नेहमी पाठिंबा देत असत. जे लोक इस्रोच्या स्थापनेत असलेल्या नेहरूंच्या योगदानाचं सत्य पचवू शकत नाहीत, त्यांनी टीआयएफआर (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) च्या स्थापनेदिवशीचं त्यांचं भाषण ऐकायला हवं. नेहरू फक्त मोठ मोठ्या गप्पा मारत नव्हते तर करूनही दाखवत होते, असं ट्वीट जयराम रमेश यांनी केलं आहे.

2014नंतर अंतराळ संशोधनात अधिक प्रगती झाल्याचा दावाही काँग्रेसने खोडून काढला आहे. हिंदुस्थानाची अंतराळवारी ही 1962 सारी INCOSPARच्या स्थापनेपासून सुरू झाली होती. या संस्थेच्या स्थापनेत होमी भाभा, विक्रम साराभाई यांच्यासह द्रष्ट्या विचारांचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा देखील सहभाग होता. ऑगस्ट 1969मध्ये साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना केली.