नवऱ्याच्या काळ्या रंगावरुन त्याला हिणवणे ही क्रूरता – कर्नाटक उच्च न्यायालय

पतीच्या काळ्या रंगावरुन त्याला हिणवणे म्हणजे क्रूरता आहे आणि त्या पुरुषाला घटस्फोट घेण्याचे हे वैध कारण असल्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायायालयाने एका प्रकरणात दिला आहे. एका जोडप्याच्या घटस्फोटाबाबत दिलेल्या निकालात हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

न्यायालयाने सांगितले की, पुराव्यांचा बारकाईने तपास केला असता त्या व्यक्तीची पत्नी त्याच्या काळ्या रंगावरुन त्याला सतत हिणवत होती आणि याच कारणामुळे ती त्याला सोडूनही गेली होती. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(अ) अंतर्गत घटस्फोटाच्या याचिका मंजूर करत उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले, ही बाब लपवण्यासाठी महिलेने आपल्या पतीवर अवैध संबंधांचे खोटे आरोप केले. हे फार चुकीचे असून ही एक प्रकारची क्रूरता आहे. बंगळुरू येथील या जोडप्याचे 2007 मध्ये लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे. मात्र काही वर्षांच्या संसारानंतर पतीने 2012 मध्ये बेंगळुरू येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. तर महिलेनेही भारतीय दंड संहितेच्या कलम 498 ए अंतर्गत तिचा पती आणि सासरच्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आणि मुलीसह आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली.

कौटुंबिक न्यायालयात तिने सर्व आरोप फेटाळले आणि पती आणि सासरच्या मंडळींनी तिचा छळ केल्याचा आरोप केला. कुटुंब न्यायालयाने 2017 मध्ये पतीने केलेली घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने सांगितले की, “पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नी त्याच्या काळ्या रंगावरुन त्याला सतत हिणवत असे. मात्र त्याच्या मुलीसाठी तो सर्वकाही सहन करत होता. यावेळी उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, पतीच्या काळ्या रंगावरुन हिणवणे ही एक क्रूरता आहे.

न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत म्हटले आहे की, “पत्नीने पतीकडे परत जाण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि रेकॉर्डवरील उपलब्ध पुराव्यांवरून हे सिद्ध होते की पतीच्या काळ्या रंगामुळे तिला या लग्नात रुची नव्हती.” उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत, कौटुंबिक न्यायालयाने हा आदेश पारित करायला हवा होता, असे निरीक्षण नोंदवले.