ऑनलाईन डेटींग मोठा स्कॅम, 66 टक्के लोक ऑनलाईन डेटींगच्या जाळ्यात फसले

तुमची प्रेयसी किंवा प्रियकरासोबत पहिल्यांदा ओळख ऑनलाईन झाली आहे का? अस असेल तर सावध व्हा. कारण तुम्हीसुद्धा ऑनलाईन डेटींगच्या स्कॅममध्ये अडकू शकता. सायबर-सुरक्षा संशोधकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 66 टक्के लोक ऑनलाईन डेटिंगच्या जाळ्यात अडकले आहेत.

प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ऑनलाईन डेटींगच्या जाळ्यात अडकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एक्सपोजर मॅनेजमेंट कंपनी टेनेबलच्या नवीन अहवालानुसार, ऑनलाईन डेटिंग घोटाळ्यांमध्ये अलिकडच्या वर्षात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. एआय (AI) आणि डीपफेक (Deepfake) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवणूक केली जातं आहे. 2023 या एका वर्षात 43 टक्के हिंदुस्थानी नागरिकांना एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आवाज बदलून फसवण्यात आले आहे. एआय आणि डीपफेक हे तंत्रज्ञान इतके उत्तम प्रकारे काम करते की 69 टक्के पेक्षा जास्त हिंदुस्थानी नागरीकांना एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेला आवाज आणि व्यक्तीचा खरा आवाज ओळखता येत नाही.

या अहवालानुसार हे घोटाळे अनेकदा फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमावर होत आहेत. एआयच्या मदतीने फेसबुक वापरकर्त्यांची खासगी माहिती चोरली जातं आहे. विशेष करून वृद्ध व्यक्ती, विधवा महिला आणि स्मरणशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले जातं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2023 मध्ये 83 टक्के लोकांनी आपले पैसे गमावले आहेत.

टेनेबलचे कर्मचारी आणि संशोधन अभियंता ख्रिस बॉयड यांनी सांगितले की, खरं प्रेम शोधणारे लोक या ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरू नये यासाठी जागरुकता वाढवण्यासाठी आणि दक्षता घेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.