डबेवाल्यांनी जागवला देशाभिमान , ‘तिरंगा संकलन’ मोहिमेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून डबेवाल्यांनी यंदा ‘तिरंगा संकलन’ मोहिमेतून देशाभिमान जागवला आहे. मंगळवारी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेल्या या मोहिमेत दोन दिवसांतच मुंबई शहर आणि उपनगरांतून 1200 हून अधिक राष्ट्रध्वज संकलित करण्यात आले. ज्या ज्या ठिकाणावरून फोन कॉल्स आले त्या त्या ठिकाणी डबेवाल्यांनी धाव घेतली आणि तिरंग्याचा सन्मान राखण्याची सामाजिक बांधिलकी जपली.

डबेवाल्यांना स्वातंत्र्यदिनी सुट्टी असते. ही सुट्टी देशसेवेसाठी सत्कारणी लावण्याच्या भावनेतून डबेवाल्यांनी यंदा तिरंगा संकलनाची विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिरंगा संकलन करण्यात आले. डबेवाल्यांच्या संघटनेतील जवळपास 1500 सभासद एकाचवेळी संपूर्ण शहरभर तिरंगा संकलनासाठी कार्यरत राहिले. यंदा पहिल्यांदाच हा उपक्रम हाती घेतला. अद्याप काही भागांत पोहोचणे बाकी आहे. त्यामुळे मोहीम गुरुवारपर्यंत विस्तारित केली आहे. संकलित केलेले राष्ट्रध्वज डबेवाल्यांच्या कार्यालयात सुरक्षित ठेवले जातील. तसेच प्रजासत्ताकदिनी हे राष्ट्रध्वज पुन्हा वितरित केले जातील, असे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या

डबेवाल्यांनी तिरंगा सन्मानार्थ विशेष मोहीम हाती घेतली व त्यासंदर्भात पुरेशी जनजागृती केली. त्यामुळे डबेवाल्यांच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. विविध संस्थांचे स्वयंसेवक डबेवाल्यांच्या सोबतीने मुंबईतील विविध गृहनिर्माण सोसायटय़ा आणि कार्यालयांच्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे संकलित केलेल्या राष्ट्रध्वजांची संख्या वाढली जाणार आहे.